Ukraine-Russia Conflict: यूक्रेन आणि रशियात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असल्याची माहिती आहे. रशियाकडून क्षेपणास्रांसोबत युद्ध अभ्यासास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळं अमेरिका, युरोपसह पश्चिमी देशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आम्ही रशियाबरोबर कोणत्याही व्यासपीठावर चर्चेकरीता तयार असल्याचं यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सकी यांनी म्हटलं आहे. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना यूक्रेन-रशियातील वादावर चर्चेतून तोडगा काढण्याची विनंती केली आहे. म्युनिक सुरक्षा परिषदेतही बोरीस जॉनसन यांच्याकडून भूमिका जाहीर कऱण्यात आली आहे. यूक्रेनची सुरक्षा हिच आमची सुरक्षितता असल्याचं बोरीस जॉनसन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांनी रशियाला इशारा दिलाय. युक्रेनवर हल्ला केल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असं कमला हॅरीस म्हणाल्यात.
अनेक देशांकडून यूक्रेन ताबडतोब सोडण्याचं आवाहन
जर्मनीकडून आपल्या नागरिकांना यूक्रेन ताबडतोब सोडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लुफ्तांझाकडून कीवकडे जाणाऱ्या फ्लाईट्स 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत रद्द कऱण्यात आल्या आहेत. तर भारताकडून यूक्रेनवरुन 3 फ्लाईट्स संदर्भात एअर इंडियानं घोषणा केली आहे. 22, 24 आणि 26 फेब्रुवारी रोजी फ्लाईट्स आॅपरेट होणार आहेत. जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचं आवाहन त्यांच्या सरकारने केलं आहे.
टाटा समूहाच्या एअर इंडियाकडून विशेष विमानांची सोय
युक्रेनमधील भारतीयांच्या सुखरुप सुटकेसाठी टाटा समूहाच्या एअर इंडियाने विशेष विमानांची सोय केली आहे. 22, 24 आणि 26 फेब्रुवारीला विशेष विमाने सोडण्यात येणार आहेत. संकटाच्या काळात देशसेवेसाठी टाटा ग्रुप नेहमी पुढाकार घेत असतो. कोरोना काळातही कंपनीने देशासाठी 1500 कोटी रुपयांची मदत केली होती.