Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चार दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये घुसले असून सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थीती अत्यंत बिकट झाली आहे. दोन्ही देश युद्ध मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. रशिया आणि युक्रेनच्या सैन्यामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. त्यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील रशियाचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा अशी मागणी केली आहे. 


युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी रविवारी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील रशियाचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात यावा. रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण हे नरसंहाराच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. रशियाने वाईटाचा मार्ग निवडला आहे आणि जगाने त्यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून बाहेर काढले पाहिजे. रशियासोबत चर्चा करण्यास तयार आहे. परंतु, रशियाने दिलेल्या प्रस्तावानुसार बोलारूसमध्ये चर्चा करणे शक्य नाही."


"आंतरराष्ट्रीय युद्ध गुन्हे न्यायाधिकरणाने रशियाकडून युक्रेनच्या शहरांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांची चौकशी करावी. रशियाने केलेले आक्रमण हे राज्य प्रायोजित दहशतवाद आहे, असे व्होदिमर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशिया हा सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांपैकी एक सदस्य आहे. त्यामुळे त्यांना प्रस्तावाला व्हेटो करण्याचा अधिकार आहे.   






रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही सैनिकांकडून एकमेकांवर तुफान गोळीबार सुरू आहे. दोन्ही देशांचे हजारो सैनिक मारले गेल आहेत. रशियाचे साडेचार हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे.  




संबंधित बातम्या: