Russia Ukraine War: रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या निषेधार्थ पाश्चात्य देशांनी रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशातच आता अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी जागतिक वित्तीय प्रणाली 'SWIFT' (SWIFT) पासून रशियन बँकांना वेगेळे करून रशियाच्या सेंट्रल बँकेविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी अमेरिका, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन आणि कॅनडाच्या नेत्यांनी यासंदर्भात संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, बंदी घातलेल्या रशियन कंपन्या आणि कुलीन वर्गाच्या (Russian oligarch) मालमत्तेचा शोध घेण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापित करण्यात आली आहे. 


काय आहे स्विफ्ट?


रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिका आणि मित्र देश ज्या स्विफ्ट प्रणालीचा वापर करत आहे, ती नेमकी आहे तरी काय? हे आधी समजून घेणं महत्वाचं आहे. 'सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन' (SWIFT) ही जगातील आघाडीची बँकिंग संपर्क सेवा आहे. जी भारतासह 200 हून अधिक देशांतील सुमारे 11,000 बँका आणि वित्तीय संस्थांना जोडते. जागतिक आर्थिक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी ही व्यवस्था अत्यंत महत्त्वाची मानली जाते. रशियाला यातून बाहेर काढल्यास, याचा रशियाच्या बँकिंग प्रणालीला मोठा धक्का बसू शकतो.   


SWIFT मधून एखाद्या देशातील बँकांना बाहेर काढून टाकणे हे एक मोठे पाऊल ठरू शकते. यामुळे जगभरात आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जगातील जवळपास सर्व बँका ही प्रणाली वापरतात. रशिया तेल आणि वायू निर्यातीसाठी या प्रणालीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. या निर्णयामुळे रशियाच्या बँका आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेपासून दूर होतील आणि जागतिक स्तरावर काम करण्याची त्यांची क्षमता कमी होईल.


रशियाच्या सेंट्रल बँकेवर निर्बंध घालण्याची तयारी 


अमेरिका आणि मित्र देशांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ''रशियन सेंट्रल बँकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर राखीव निधीचा पुरवठा करण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.'' दरम्यान, रशियाला SWIFT पासून वेगेळे करायचे की नाही, यासाठी पाश्चात्य देशांमध्ये  बैठक पार पडली. या बैठकीत काही देशांनी असं केल्यास तेल आणि गॅसच्या किंमतीत वाढ होणार असा मुद्दा देखील उपस्थित केला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :