बगदाद : इराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पुन्हा एकदा रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. दोन रॉकेट याठिकाणी डागण्यात आले आहेत. मात्र या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहितीही समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच इराकमधील अमेरिकेच्या दुतावासावर इराण समर्थक मिलिशियाने रॉकेट हल्ला केला होता. तर काल इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्कळी तळांवर डझनहून अधिक क्षेपणास्त्र डागली होती.
इराकमधील ग्रीन झोनमध्ये पुन्हा एकदा रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेचं दूतावास असणाऱ्या भागापासून जवळपास 100 मीटर अंतरावर हा हल्ला झाला असून इराक सेनेनेही दोन रॉकेट हल्ले झाल्याची पुष्टी केली आहे. 5 जानेवारीला सुद्धा इराण समर्थक मिलिशियाने बगदादमधील ग्रीन झोनमध्ये रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्यात काही रॉकेट अमेरिकेन दुतावासाच्या आतही पडले होते.
काल इराणने इराकमधील अमेरिकेन लष्कर तळांवर 22 रॉकेट हल्ले केले होते. अबरिल, अल असद आणि ताजी सैन्य या तळांवर हल्ला इराणने केला होता. यामध्ये 80 अधिक जण मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात येत होता. मात्र या हल्ल्यात कोणतंही नुकसान झालं नसल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख जनरल कासिम सुलेमानी मारले गेले होते.
सुलेमानी यांच्या हत्येचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचं इराणने जाहीर केलं होतं. या हल्ल्यात सुलेमानी यांच्यासह अनेक सैनिकही मारले गेले होते. हल्ल्यात सुलेमानी यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. मृतदेहाची ओळख पटवणं कठीण होतं. मात्र सुलेमानी यांच्या अंगठीमुळे त्यांची ओळख पटली. मात्र सुलेमानी यांच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखीच वाढला आहे.
अमेरिका-इराण तणावाचा परिणाम विमानसेवेवर
अमेरिका-इराण यांच्यातील तणावामुळे मुंबईहून युरोप व अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांना 30 ते 40 मिनिटांचा फेरा वाढणार आहे. यामध्ये टोरोन्टो, न्यूयॉर्क, स्वित्झर्लंड, म्युनिक, पॅरिस, लंडन, अॅमस्टरडॅम, कैरो, फ्रॅन्फफर्ट, सेशेल्स, इस्तंबुल व नैरोबी या शहरांसाठीच्या सुमारे 20 उड्डाणांचा समावेश आहे. याखेरीज होमरुझच्या आखाताला लागून असलेल्या कुवैत सिटी, ओमान येथे जाणाऱ्या विमानांनादेखील खबरदारीचा म्हणून आखाती देशांमधील सौदी अरेबियाकडून वळसा घालून जाण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या :
- इराणचा अमेरिकन लष्करी तळांवर मोठा हल्ला, डझनहून अधिक क्षेपणास्र डागली
- डॉनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करणाऱ्यास इराणच्या संस्थेकडून 500 कोटींचे बक्षिस
- इराणकडून बदला? अमेरिकी दूतावासासह हवाईतळावर हल्ला
- अमेरिकेचा पुन्हा एकदा इराकवर हवाई हल्ला, सहा जणांचा मृत्यू
WEB Explainer | मोदी सरकार महाराष्ट्राची आर्थिक कोंडी करतंय का? | एबीपी माझा