बगदाद : अमेरिकेने पुन्हा एकदा इराकवर हवाई हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. इराणवर निशाणा साधण्यासाठी अमेरिकेने हा हल्ला केला आहे. इराकची संघटना हशद अल शाबीवर निशाणा साधण्यासाठी अमेरिकेने हा हल्ला केला आहे. हशद अल शाबी संघटनेला इराणचा पाठिंबा मिळालेला आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 1 वाजून 12 मिनिटांनी हल्ला करण्यात आलं आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रॉकेट हल्ला होता. अमेरिकेने डागलेलं रॉकेट गाड्यांवर येऊन पडलं आणि त्यामुळे गाड्यांनी पेट घेतला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मोबलायजेशन फोर्सेसच्या मोठ्या नेत्याचा या हल्लात मृत्यू झाल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


अमेरिका आणि इराणमधील संबंधांमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र अमेरिका याबाबत नकार देत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं. ट्रम्प यांनी म्हटलं की, आम्ही जी कारवाई केली आहे, ती युद्ध सुरु करण्यासाठी नाही तर युद्ध संपवण्यासाठी केलेली आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा कमांडर कासीम सुलेमानीच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांचं हे वक्तव्य आलं आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करप्रमुख पदाचा अधिकारी कासिम सुलेमानीला बगदाद विमानतळावर हवाई हल्ला करुन ठार केलं.


अनेक अमेरिकी नागरिकांच्या हत्येचा आरोप सुलेमानीवर होता. इराणमधील अमेरिकेच्या दुतावासावर हल्ल्या केल्याचाही आरोप सुलेमानीवर होता. ट्रम्प यांचे कट्टर विरोधक आणि अमेरिकेला कायम धमक्या देण्याचं काम सुलेमानी यांनी केलं. सेना प्रमुख असल्याने सुलेमानींकडेच कुड्स सेनाचे नेतृत्व होतं. 2019 च्या एप्रिल महिन्यात अमेरिकेनं इराण रिव्हॉल्युशनरी गार्डसह कुर्द सेनेला 'परदेशी दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतरही त्यांच्या कारवाया सुरुच होत्या. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सुलेमानी यांना इशारा दिला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेनं एअर स्ट्राईक केला.