Turkey Syria Updates : तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर येथील परिस्थिती फार बिकट झाली आहे. भूकंपानंतर सुमारे 100 हून अधिक तास उलटून गेले आहेत. तुर्की प्रशासन आणि भारतीय NDRF टीमकडून अनेक भागांमध्ये अद्यापही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. भूकंपातील मृतांचा आकडा 23 हजारांच्या पुढे गेला आहे. अद्यापही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. 108 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. भूकंपामुळे हे चौघे जण ढिगाऱ्याखाली अडकले गेले होते, मात्र त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.


जीवनासमोर मृत्यूही हरला


बचाव पथकाने शुक्रवारी हताय प्रांतातून एका कुटुंबाला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढलं आहे. या कुटुंबाने जीवनासमोर मृत्यूला हरवलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 108 तास एक महिला आणि तिची तीन मुले ढिगाऱ्याखाली अडकली होती. या चौघांना सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. महिला आणि तिच्या तिन्ही मुलांवर सध्या उपचार सुरु आहेत.


संकटात अडकलेल्या तुर्कीला भारताची साथ


तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) विनाशकारी भूकंप (Earthquake) झाला आहे. भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे 23 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा गेल्या काही दशकातील सर्वात मोठा भूकंप आहे. प्रशासन मदत आणि बचावकार्यामध्ये गुंतलं आहे. अनेक भागांत अद्याप मदतीचं साहित्य पोहोचलेलं नाही. भारताने संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. 'ऑपरेशन दोस्त'द्वारे (Operation Dost) भारत भूकंपग्रस्त भागात मदत पोहोचवत आहे.


भूकंपामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत


NDRF ची पथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसत आहेत. तुर्कस्तानमधील हताया (Hatay) येथे भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक लोक अडकले आहेत. 


ढिगाऱ्याखाली भूक आणि थंडीमुळे अनेकांचा मृत्यू


भूकंपातून बचावलेल्यांसमोर आता भूक आणि थंडींचं संकट आहे. भूकंपामध्ये अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक भागात अन्नाचं संकटही निर्माण झालं आहे. अनेक लोकांचा ढिगाऱ्याखाली अडकून भूक आणि थंडीमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मदत आणि बचाव पथकांसमोर मोठं आव्हान आहे. दरम्यान, मदत आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Turkey Earthquake : तुर्कीनंतर आता भारतातही विनाशकारी भूकंप? तुर्कीतील भूकंपाचं भाकित करणाऱ्या वैज्ञानिकाची धक्कादायक भविष्यवाणी