मुंबई: बघता बघता पत्त्यांचा बंगला कोसळावा तसं तुर्कीमधल्या अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. कुणी कल्पनाही केली नसेल इतकं मोठं हे संकट आहे. तुर्कीत 5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान म्हणजे जवळपास 48 तासात भूकंपाचे 39 हून अधिक धक्के बसलेत. यात विशेष म्हणजे युरोपातल्या एका शास्त्रज्ञाने या भूकंपाचा अंदाज तीन दिवसांपूर्वी वर्तवला होता.  त्याचा अंदाज जसंच्या तसा खरी ठरली आहे. जवळपास 20 हजाराहून अधिक लोकांचा जीव घेणारे हा तुर्कस्तान आणि सिरीयामध्ये भूकंप नेमका कसा झाला? त्यामागची कारणं काय? 


तुर्कीमध्ये सोमवारी म्हणजेच 6 फेब्रुवाराला 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपांची नोंद करण्यात आली. मंगळवारीसुद्धा इथं 5 रिश्टर स्केलहून अधिक तीव्रता असणारे भूकंप झाले. त्याच काळात लहान मोठे धक्केपण जाणवतच होते. तुर्कीसोबतच लेबनान, इस्राईल, सीरियामध्ये भूकंपाचे हादरे बसलेत. 


तुर्कस्तानमध्ये दर महिन्याला भूकंप होतात आणि हा प्रदेश भूकंपांसाठी सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक मानला जातो. तुर्कीच्या आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण (AFAD) च्या आकडेवारीनुसार, एकट्या 2020 मध्ये, येथे 33,000 हून अधिक भूकंप आढळून आले आहेत. त्यापैकी 322 भूकंपांची तीव्रता 4.0 पेक्षा जास्त होती. 


गेल्या वर्षी जगातील तीन मोठे भूकंप तुर्की आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात झाले. जानेवारीमध्ये पूर्व इलादुगमध्ये 41 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये, पश्चिम इझमीरमध्ये 6.6 तीव्रतेचा भूकंप झाला आणि 117 लोकांचा मृत्यू झाला होता. 


तुर्कीमध्ये वारंवार भूकंप होण्याचे कारण टेक्टोनिक प्लेट्स आहेत. सुमारे 8 कोटी लोकसंख्या असलेला देश 4 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेला आहे आणि एका प्लेटच्या हालचालीमुळे संपूर्ण प्रदेशाला जोरदार हादरे जाणवतात. तुर्कीचा सर्वात मोठा भाग अॅनाटोलियन प्लेटवर आहे, जो दोन प्रमुख प्लेट्स, युरेशियन आणि आफ्रिकन आणि एक लहान, अरबी प्लेट यांच्यामध्ये आहे. आफ्रिकन आणि अरेबियन प्लेट्स जसजसे बदलतात तसतसे संपूर्ण तुर्की हिंसकपणे थरथरू लागतं.


तुर्कीची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर तुर्की ज्या मायक्रोप्लेट्सवर वसलंय ते उलट दिशेने जात आहेत, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. अरेबियन प्लेट या छोट्या प्लेट्सला धक्का देत आहे. फिरणाऱ्या अॅनाटोलियन प्लेटला जेव्हा अरेबियन प्लेटने धक्का दिला जातो तेव्हा ती युरेशियन प्लेटला आदळते. त्यामुळे भूकंप होतात. तेही दोनदा.  पहिले अरेबियन प्लेटच्या धडकेने आणि दुसरी युरेशियन प्लेटमुळे.


तुर्कीमधील भूकंपाचा इतिहास काय सांगतो?


तुर्कस्तानला भूकंपाचा मोठा इतिहास आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1900 पूर्वी तुर्कीमध्ये भूकंपामुळे 6 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 1900 ते 1999 या काळात सुमारे 70 हजार मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. 27 डिसेंबर 1939 रोजी तुर्कीमध्ये सर्वात विनाशकारी भूकंपाची नोंद झाली. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.2 इतकी मोजली गेली. ज्यामध्ये 30,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. नोव्हेंबर 1976 मध्ये, पूर्व तुर्कस्तानमधले 7.3 तीव्रतेच्या भूकंपात सुमारे 4,000 लोक मारले गेले.


तुर्कीला भूकंपाच्या हादऱ्यानं उद्ध्वस्त केलं असतानाच भारताकडून तातडीनं मदतीचा हात पुढे करण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाकडून तुर्कीसाठी मदतीची घोषणा केल्यानंतर लगेचच एनडीआरएफचं पहिलं पथक तुर्कीच्या दिशेनं रवाना झालं. भारतीय वायूदलाच्या विमानातून हे पथक मदतीसह तिथं पोहोचलं. या पथकामध्ये पुरुष आणि महिला स्वयंसेवकांसह डॉग स्क्वाड, प्रथमोपचार सामग्री आणि काही महत्त्वाच्या उपकरणांचाही समावेश आहे.