नवी दिल्ली : जगाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस हा ऐतिहासिक असाच आहे. आजच्या दिवशीच म्हणजे 29 मे 1953 साली न्यूझिलंडचे सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनजिंग नॉर्गे यांनी जगातील अशक्य अशा वाटणाऱ्या सर्वात उंच माऊंट एवरेस्टची मोहीम सर केली होती. त्या आधी या एवरेस्टवर चढाई करणे म्हणजे केवळ स्वप्न होतं. 


माऊंट एवरेस्ट हा जगातील सर्वात मोठा आणि चढाईस कठीण असा पर्वत आहे. भौगोलिक दृष्ट्या नेपाळमध्ये वसलेल्या या पर्वताची उंची ही 8848 मीटर आहे. 1953 सालाच्या पूर्वी अनेकांनी या पर्वतावर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता पण सर्वांनाच अपयश आलं होतं. स्वत: सर एडमंड हिलरी यांनी एवरेस्ट दोन वेळा सर करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात ते अयशस्वी ठरले होते. पण हिलरी यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. 1953 साली त्यांनी आपला सहकारी तेनजिंग नॉर्गे यांच्या सोबत पुन्हा एकदा एवरेस्ट सर करण्याची मोहीम आखली.


शेवटी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या सहाय्याने त्यांनी 29 मे 1953 रोजी एवरेस्टवर आपला झेंडा रोवला. त्यांच्या या धाडसाचं जगभरातून कौतुक होऊ लागलं. ब्रिटनच्या राणीने त्यांना 'नाईट' ची उपाधी दिली. पण हिलरी एडमंड यांना मिळालेला हा सन्मान नेपाळच्या शेर्पा तेनजिंग नॉर्गे यांना मिळाला नाही. त्यानंतर एडमंड हिलरी यांनी पुढच्या काही वर्षात हिमालयातील अनेक पर्वतं सर केली. हिमालयातील पर्वतांवर प्रेम करणाऱ्या सर एडमंड हिलरी यांनी नेपाळच्या शेर्पा लोकांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठीही काही प्रयत्न केले. त्यांनी शेर्पा लोकांच्या मुलांसाठी शाळा, हॉस्पिटल्स, अनेक नद्यांवर पूल बांधले. इतरही अनेक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 


माऊंट एवरेस्ट सर करणारी पहिली व्यक्ती ठरलेले न्यूझिलंडचे सर एडमंड हिलरी यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत पर्यावरणासंबंधी काम केलं. त्यांनी 1953 साली केलेल्या कामगिरीमुळे आज अनेक लोकांचा आत्मविश्वास वाढला असून जगातले सर्वात उंच पर्वत सर करणं आता मानवाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीसमोर मोठं राहिलं नाही. 


महत्वाच्या बातम्या :