Corona Crisis Investigation: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना कोरोना व्हायरस नेमका कुठुन आला आहे याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की, कोरोना व्हायरस चीनकडून जाणूनबुझून पसरवण्यात आला आहे का? की या व्हायरसची निर्मिती चीनच्या लॅबमध्ये चुकून झाली. याबाबत 90 दिवसांच्या आत याबाबत माहिती काढा, असे आदेश दिले आहेत. तसंच बायडन यांनी चीनला आवाहन केलं आहे की, या आंतरराष्ट्रीय चौकशीसाठी सहकार्य करावं. 


जो बायडन यांच्याआधीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी देखील अनेकदा कोरोना व्हायरस हा चिनी व्हायरस असल्याचं किंवा चीनने मुद्दाम पसरवल्याचं म्हटलं होतं. कोरोनानं जगभरात थैमान घातले आहे दुसरीकडे जवळपास दीड वर्षानंतरही कोरोनाचा उगम कसा झाला हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. कोरोनाची उत्पत्ती कशी झाली याची चौकशी, तपास करण्यासाठी अमेरिकेची नॅशनल लॅब एजन्सी मदत करणार आहे.  


भारतातील कोरोना स्थिती भयावह, लॉकडाऊन लावणं गरजेचं : अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची


बायडन यांनी म्हटले आहे की, जगात कोरोनाच्या उत्पत्तीसाठी केवळ दोन सिद्धांत समोर आले आहेत. यामध्ये प्राण्यांपासून माणसांना विषाणूची लागण होणे अथवा प्रयोगशाळेत विषाणूची निर्मिती करणे. सध्या या दोन्ही सिद्धांतावर फार अधिक भाष्य करता येऊ शकत नाही. त्यामुळेच कोरोनाबाबतचा तपास वेगाने करण्याची सूचना देण्याची आली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 


अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये दावा करत म्हटलं आहे की, जगात कोरोनाचा संसर्ग होण्याआधीच वुहान येथील प्रयोगशाळेतील तीन संशोधकांना कोरोनाची लागण झाली होती. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हारोलॉजीमधील तीन संशोधक 2019 मध्ये आजारी पडले होते. त्यावेळी त्यांनी उपचारासाठी मदतही मागितली होती. या संशोधकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती.   
 
अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊचींनी मे महिन्यातच म्हटलं की, हा व्हायरस प्राण्यांमधून माणसांमध्ये शिरला याची त्यांना खात्री आहे. पण तो नैसर्गिकरीत्या जन्माला आल्याबद्दल आता आपल्याला खात्री नाही असंही त्यांनी म्हटलं होतं.