मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम हाती घेतल्यानंतर देशातील जवळपास सर्वच भागांमध्ये लसींचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली. ज्यामुळं लसीकरण मोहिमांमध्ये विभागणी करत प्राधान्यक्रमानुसार लस वितरणास सुरुवात करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिकेकडून लसीकरणासाठीची सुधारित नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या नव्या नियमावलीची माहिती दिली. ज्यामध्ये परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरण मोहिमेत सोप्या पद्धतीनं सहभागी होता येणार आहे.
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वॉक इन सुविधेद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार आहे. 18 ते 44 वयोगटातील परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कस्तुरबा, राजावाडी, कुपर रुग्णालयात लसीकरणाची वॉक इन सुविधा करण्यात आली आहे.
येत्या सोमवारपासून ऑन स्पॉट वॉक इन लसीकरण सुविधा सुरु करण्यात येणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशी खालील गटातील लाभार्थ्यांना राहत्या प्रभागाच्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर थेट जाऊन लस घेता येणार आहे.
ऑनस्पॉट वॉक इनसाठी पात्र लाभार्थी वर्ग...
- 45 आणि त्यावरील वयोगटातील कोविशील्ड लसीच्या पहिल्या / दुस-या डोसचे लाभार्थी दिव्यांगांना प्राधान्य असेल
- आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कस कोविशील्डच्या दुस-या डोसचे लाभार्थी
- कोवॅक्सिनच्या सर्व वयोगटातील दुस-या डोसचे लाभार्थी--दिव्यांगांना प्राधान्य...
- स्तनदा माता
- 18 ते 44 वयोगटातील परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांसाठी कस्तुरबा,राजावाडी, कुपर रुग्णालयात लसीकरणाची वॉक इन सुविधा
गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी कोविन अॅपवरील नोंदणीनुसारच लसीकरण पार पडणार आहे, तर रविवार लसीकरण केंद्र सुट्टी असल्यामुळं बंद असतील. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार राज्यातील इतर शहरांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही विद्यापीठाकडून अशा पद्धतीनं लसीकरणासाठी सोय करण्यात येण्याची विचारणा करणअयात येणार आहे.