Sudan Crisis:

  सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आयएनएस सुमेधा आता सुदानमधून रवाना झाली आहे. 278 भारतीयांना भारतीय नौदलाचे जहाज सुखरुप घेऊन येत आहे. सुदानमध्ये (Sudan) अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी भारताचे ऑपरेशन कावेरी सुरु झाले आहे. या संबंधितची माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सोमवारी ट्वीट करत दिली होती. सुदानमधील भारतीय (india) नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी या ट्वीटद्वारे सांगितलं. 


गेल्या 11 दिवसांपासून सुदानची राजधानी खार्तूममध्ये देशाचे सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यात संघर्ष सुरु असल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध प्रकारचा हिंसाचार सध्या सुदानमध्ये होत आहे. या परिस्थितीमधून भारतीय नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत 500 भारतीय नागरिक सुखरुपपणे सुदान पोर्टवर पोहचले आहेत आणि त्यांना आयएनएस सुमेधामधून भारतात आणण्यात येत आहे. 








 


इतर देशांचे भारताला सहाय्य...


फ्रान्सने त्यांच्या हवाईदलाच्या सहाय्याने पाच भारतीय नागरिकांना सुखरुपणे बाहेर काढले असल्याची माहिती फ्रान्सच्या राजनैतिक सूत्रांनी दिली आहे. या भारतीयांना इतर देशातील नागरिकांसोबत फ्रान्सच्या वायूदलाच्या विमानतळावर उतरवण्यात आले. सौदी अरेबियाने देखील सांगितले की, त्यांचे जवळचे संबंध असलेल्या देशांच्या 66 नागरिकांना सुखरुपणे सुदानमधून बाहेर काढण्यात आले. यात काही भारतीयांचा देखील समावेश आहे. 


पंतप्रधांनांचे नागरिकांना सुखरुप परत आणण्याचे दिले निर्देश...


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदाममधील भारतीय नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासंर्दभातच शुक्रवारी 21 एप्रिल रोजी दिल्लीत अधिकाऱ्यांची बैठकसुद्धा झाली. तसेच सर्व भारतीय सुखरुपणे बाहेर येतील असं आश्वासन देखील परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी दिले आहे. रविवारी भारताने सुदाममधील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हवाईदलाचे सी-130जे हे विमानसुद्धा तयार ठेवले होते. 


आतापर्यंत सुदानमध्ये झालेल्या हिंसाचारात 400 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळे सुदानमधील परिस्थिती फार गंभीर आहे. त्यामुळे प्रत्येक देशाचे त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.




 









संबंधित बातमी