Sudan Crisis: अंतर्गत कलहामुळे सुदान (Sudan) गेल्या आठवडाभरापासून जळत आहे. सुदानमध्ये 15 एप्रिलपासून लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 400 लोकांचा मृत्यू झाला आहे. राजधानी खार्तूमसह सुदानची अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. सुदानमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेची हानी झाली आहे.
सुदानमध्ये लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह अल बुरहान आणि आरएसएफ (RSF) प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डगालो यांच्यात वर्चस्वाचे युद्ध सुरू आहे. सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यातील युद्धात कोण बाजी मारणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, अल-बुरहानचे सैन्य आरएसएफपेक्षा अधिक मजबूत आहे. अशा स्थितीत निमलष्करी दलाच्या विजयाची शक्यता कमी दिसते. मात्र, शहरी भागात निमलष्करी दलाचे जवान लष्करावर वर्चस्व गाजवतील असे दृश्य निर्माण झाले आहे.
शेजारी देशांनाही धोका
अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, सुदानच्या आजूबाजूची आणखी अनेक शहरे लवकरच सुरू असलेल्या हिंसाचाराच्या कचाट्यात येऊ शकतात. सुदानची राजधानी खार्तूम येथून ही हिंसक चकमक सुरू झाल्याची माहिती आहे. सुदानमधील अंतर्गत कलहाचा फटका ओमदुरमन आणि दारफुरसह अनेक शहरांना बसतो आहे. इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपने म्हटले आहे की, लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या या अंतर्गत हिंसाचाराने युद्धाचे स्वरूप घेतले आहे. भविष्यात या युद्धाचा परिणाम शेजारील देशांवरही होऊ शकतो, अशावेळी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
सुदानच्या बाहेरदेखील होऊ शकते लढाई
वॉशिंग्टन स्थित सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजचे कॅमेरॉन हडसन यांनी सुदानमधील हिंसाचार सुदानच्या सीमेपलीकडे वाढू शकतो असे म्हटले आहे. सुदानमधील अंतर्गत संघर्ष देशभर पसरला आहे, असे ते म्हणतात. अशा स्थितीत ही लढाई सुदानच्या बाहेर पडल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी टिप्पणी कॅमेरॉन हडसन यांनी केली आहे.
सुदानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान, खार्तूममधील अनेक रुग्णालये बंद करण्यात आली आहेत. या हिंसाचारादरम्यान भारतातील अनेक लोक (Indian) देखील सुदानच्या विविध भागात अडकले आहेत. अंतर्गत वादासह लैंगिक शोषण, बलात्कार यांसारख्या घटना सुदानमध्ये खूप वाढल्या आहेत. ऑक्टोबर 2021 मध्ये सुदानमध्ये नागरिक आणि लष्कराच्या संयुक्त सरकारची सत्तापालट झाली होती. तेव्हापासून लष्कर आणि निमलष्करी दल आमनेसामने आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: