Sri Lanka News: भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याविरोधात लोकांचा रोष वाढत आहे. राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी (9 एप्रिल) हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. आज देखील तरूणांचा मोठा समूह राजपक्षे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र कोलंबो येथे पाहायला मिळत आहे. अशातच देशातील मोठ्या व्यापारी समुदायानेही राष्ट्राध्यक्षांना पाठिंबा काढून घेण्यास सुरुवात केल्याने राजपक्षे यांच्यावरील दबाव वाढला आहे. 1948 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर श्रीलंकेतील 22 दशलक्ष लोकांना पहिल्यांदाच अशा भीषण मंदीचा सामना करावा लागत आहे. देशात गेल्या काही आठवड्यापासून वीज कपात, अन्न, इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. 


राष्ट्रपतींच्या सचिवालयाला घेराव


गोताबया राजपक्षे यांच्या विरोधात देशात प्रचंड रोष निर्माण झाला असून यातच मोठ्या संख्येने लोकांनी राष्ट्रपती सचिवालयाला वेढा घालत "गो होम गोता", असा नारा लगावत आहेत. राजपक्षे यांच्याविरोधात अनेक लोक फलक घेऊन निदर्शन करत आहेत. ज्यावर लिहिलं आहे की, "तुमची (राष्ट्रपती) जाण्याची वेळ आली आहे, आता बस झालं.'' नागिरकांचं आंदोलन पाहता राष्ट्रपती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स लावत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हे आंदोलन शांततेत सुरू आहे, मात्र एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गरज पडल्यास अश्रूधुराचा आणि पाण्याचा मारा केला जाऊ शकतो.


व्यापारी वर्गही राष्ट्रपतींच्या विरोधात


राजपक्षे यांच्या निवडणूक प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देणारा श्रीलंकेचा व्यापारी समुदाय शनिवारी राष्ट्रपतींच्या विरोधात जात असल्याचे दिसून आले. श्रीलंका असोसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्सपोर्टर्स ऑफ रबर प्रॉडक्ट्सचे प्रमुख रोहन मासाकोर्ला म्हणाले, "सध्या सुरू असलेलं राजकारण आणि आर्थिक मंदी यापुढे चालणार नाही, आम्हाला एका आठवड्यात मंत्रिमंडळ आणि अंतरिम सरकार हवे आहे."


महत्त्वाच्या इतर बातम्या :