Imran Khan :पाकिस्तान (Pakistan) तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकारने नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले. पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात त्यांच्या सरकारचा पराभव झाला. इम्रान खान यांच्या विरोधात 174 मते पडली. तर, इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. 342 सदस्यांच्या संसदेत 174 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. मात्र, इम्रान खान यांना सत्तेतून बेदखल करण्याचे काम एका दिवसाचे नव्हते. त्याची दीर्घ घटनाक्रम आहे. चला, त्यावर एक नजर टाकूया.
जिओ टीव्हीनुसार, 2021 च्या अखेरीस, पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) ने पाकिस्तान मुस्लिम लीग (N) चे सुप्रीमो नवाझ शरीफ यांना तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी राजी करण्यास सुरुवात केली होती.
- 28 नोव्हेंबर 2021 : पीपीपीचे दिग्गज नेते खुर्शीद शाह यांनी संसदेत इन-हाउस बदलाचे संकेत दिले आणि म्हटले की, पंतप्रधान इम्रान खान यांची हकालपट्टी करण्यासाठी विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ असेल.
- 24 डिसेंबर 2021 : PML-N नेते अयाज सादिक यांनी देखील सूचित केले की, विरोधी पक्ष सत्ता बदलाची तयारी करत आहेत.
- 11 जानेवारी 2022 : PML-N चे दिग्गज नेते ख्वाजा आसिफ म्हणाले की, सरकारने बहुमत गमावले असून आता सत्ता बदल होईल.
- 18 जानेवारी 2022 : पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले की, सिनेट अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास आणण्याची तयारीत आहेत. विरोधकांना पंतप्रधानांना पायउतार करायचं आहे.
- 21 जानेवारी 2022 : अयाज सादिक म्हणाले की, विरोधक पंतप्रधानांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी तयार असून लवकरच वेळ ठरवतील.
- 7 फेब्रुवारी 2022 : पीएमएल-एन आणि पीपीपी यांनी अविश्वास प्रस्तावावर अधिकृतपणे चर्चा केली.
- 8 फेब्रुवारी : शाहबाज यांनी एमक्यूएम-पीकडे इम्रान खानविरुद्ध अविश्वास प्रस्तावाचा पर्याय सादर केला. एमक्यूएम-पी नेता आमिर खान यांनी पक्षाच्या समन्वय समितीसमोर प्रस्तावासाची विनंती सादर करण्याची घोषणा केली.
- 11 फेब्रुवारी : GE TV नुसार, पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी विरोधकांच्या वतीने पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली.
- 8 मार्च : विरोधकांनी अखेर अविश्वास ठराव मांडला.
- 12 मार्च : नवाझ शरीफ आणि असंतुष्ट पीटीआय नेते अलीम खान यांनी लंडनमध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली.
- 27 मार्च : इम्रान खान यांनी दावा केला की विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव हा त्यांना सत्तेतून बाहेर करण्याच्या परकीय निधीसाठीच्या षडयंत्राचा भाग आहे.
- 28 मार्च : संसदेत विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. यावेळी पीटीआयला पीएमएल-क्यू पक्षाने पाठिंब्याचं आश्वासन दिलं. त्यावेळी BAPने विरोधकांशी हातमिळवणी केली. बलुचिस्तानमधील अपक्ष एमएनए मोहम्मद अस्लम भुतानी यांनीही सत्ताधारी आघाडी सोडून विरोधी पक्षात प्रवेश केला.
- 31 मार्च : पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावासाठी पाकिस्तान संसदेचे अधिवेशन 3 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आलं.
- 3 एप्रिल : संसदेचे अध्यक्ष कासिम सुरी यांनी अविश्वास प्रस्ताव नाकारला, प्रस्तावाला असंवैधानिक म्हटलं आणि कार्यवाही संपवली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसद बरखास्त केली. सर्वोच्च न्यायालयाने राजकीय परिस्थितीची स्वतःहून दखल घेतली.
- 7 एप्रिल : सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा संसदेची स्थापना करत संसदेचे अध्यक्ष असद कैसर यांना शनिवारी अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले.
- 8 एप्रिल : इम्रान खान म्हणाले, 'आपण परदेशी सरकारची स्थापना सहन करणार नाही आणि तसे झाल्यास जनतेकडे पाठींबा मागू.'
- 9 एप्रिल 2022 च्या रात्री इम्रान खान यांच्या सरकारचा अविश्वास प्रस्तावात पराभव झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Pakistan New PM : इम्रान खाननंतर 'हे' होणार पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान, सोमवारी होणार अधिकृत घोषणा
- Pakistan Political Crisis: अविश्वास प्रस्ताव मंजूर, पाकिस्तानातील ‘इम्रान’ सत्तेचा अंत!
- Corona in China : चीनच्या शांघायमध्ये वाढला कोरोनाचा धोका, कडक लॉकडाऊनमुळे अन्नाची टंचाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha