कोलंबो : आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. एकीकडे राजपक्षे सरकारवर सातत्याने टीका होत आहे आणि आता श्रीलंकेतील जनता रस्त्यावर उतरत आहे. श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सनथ जयसूर्याने आपल्या देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकटावरुन नागरिक रस्त्यावर उतरले असून सरकारचा निषेध करत आहेत. आंदोलन करणाऱ्या या नागरिकांना सनथ जयसूर्याने पाठिंबा दिला आहे. देशातील परिस्थिती 'दुर्दैवी' असल्याचं जयसूर्या म्हणाला.


भारत आमचा मोठा भाऊ : जयसूर्या
याचवेळी सनथ जयसूर्याने भारताला उल्लेख 'मोठा भाऊ' असा केला आहे. तो म्हणाला की, "आमचा शेजारी देश आणि 'मोठा भाऊ' म्हणून भारताने कायमच आमची मदत केली आहे. आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत. आमच्यासाठी देशातील सध्याच्या परिस्थितीत जिवंत राहणं सोपं नाही. आम्ही भारत आणि इतर देशांच्या मदतीने या परिस्थितीतून बाहेर पडण्याची आशा व्यक्त करतो."


एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सनथ जयसूर्या म्हणाला की, देशाचे नागरिक अनेक महिन्यांपासून या परिस्थितीचा सामना करत आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की नागरिकांना अशा परिस्थितीतून जावं लागल आहे. अशाप्रकारे ते जिवंत राहू शकत नाही आणि त्यामुळेच त्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. गॅसचा तुटवडा आहे, तासन् तास विजेचा पुरवठा नाही.


तो पुढे म्हणाला की, नागरिकांनी आता श्रीलंकन सरकारचा विरोध करण्यास सुरुवात केली आहे. आपण पीडित असल्याचं ते सरकारला दाखवून देत आहेत. याची पूर्णत: जबाबदारी सध्याच्या सरकारची आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं नाही तर ती आपत्तीमध्ये रुपांतरित होईल. दरम्यान जयसूर्याने नागरिकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. 


श्रीलंकेतील नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल आहे. डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि मिल्क पावडरसाठी 3 ते 4 किमी लांबीचा रांगा लागत आहेत. हे अतिशय दु:खद आहे, असं जयसूर्या म्हणाला.






श्रीलंकेत आर्थिक संकट आणि सरकार अल्पमतात
श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे देशाचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांचं सरकार अल्पमतात आलं आहे. आर्थिक संकट पाहता श्रीलंकेत आणीबाणी घोषित करण्यात आली होती, पण त्यानंतर ही हटवण्यात आली. आणीबाणी मागे घेतल्यानंतर पहिल्यांदा संसदेचं अधिवेशन बोलावण्यात आलं होतं, पण यात सरकारचे अनेक सहकारी आले नाही. श्रीलंकेच्या संसदेत एकूण 225 सदस्य आहे. अशात बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. पण 41 खासदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. 


संबंधित बातम्या