Sri Lanka Economic Crisis : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत सोमवारी रात्रीपर्यंत सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू होती. मोठ्या संख्येने आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या निवासस्थानाकडे कूच करताना दिसले. श्रीलंकेत लागू करण्यात आलेला 36 तासांचा कर्फ्यू सोमवारी उठवण्यात आला आहे. त्यानंतर लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी घोषणाबाजी करताना दिसत आहेत. सोमवारी राजधानी कोलंबो शहरातील गॅले रोडवर आंदोलकांच्या समर्थनार्थ कार आणि इतर वाहनांमधील मोठ्या संख्येने लोक हॉर्न वाजवताना दिसले. सरकारविरोधी निदर्शनं तीव्र झाली असून नागरिक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.


मिळालेल्या वृत्तानुसार, आर्थिक संकटामुळे त्रस्त आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. कोलंबोतील फॉल्स रोडवर आंदोलकांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी उभारण्यात आलेले बॅरिकेड्स आंदोलकांनी पाडले आहेत. सध्या श्रीलंकेच्या अनेक भागात सरकारविरोधात निदर्शनं सुरू आहेत.


आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी या संकटाच्या काळात पुढच्या टप्प्याबाबत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांसोबत एक महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या आंदोलक राजपक्षे सरकारला जोरदार विरोध करत आहेत. तसेच पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.


दरम्यान, राष्ट्रपतींच्या बैठकीनंतर श्रीलंकेतील एसएलपीपीचे महासचिव सागर करियावासम म्हणाले की, 'सत्ताधारी पक्षाचे खासदारांची राष्ट्रपतींसोबत भेट झाली. यावेळी बैठकीत आम्ही आमचे मत राष्ट्रपतींसमोर ठेवले आहे. आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे अध्यक्ष राजपक्षे राजीनामा देणार नाहीत.'


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha