South Korea Martial Law Latest News: दक्षिण कोरियाचे (South Korea) राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी अवघ्या सहा तासांमध्ये मार्शल लॉ अर्थातच देशातील आणीबाणीचा निर्णय मागे घेण्याचा आदेश दिला आहे. कोरिया हेराल्डच्या वृत्तानुसार, देशातील नागरिकांनी या निर्णयाविरोधात तीव्र निदर्शने केलीत. हे पाहताच राष्ट्रपतींनी बुधवार सकाळी 4 डिसेंबर रोजी आपला आदेश मागे घेतला आणि नॅशनल असेंब्लीची विनंती मान्य केली. तसेच हा निर्णय अचानक घेतल्यामुळे तो अल्पकालिनच होता असंही राष्ट्राध्यक्षांनी कबुल केलं. 


"मी ताबडतोब नॅशनल असेंब्लीची विनंती स्वीकारत आहे आणि कॅबिनेटद्वारे मार्शल लॉ मागे घेत आहे,' असं राष्ट्राध्यक्ष युन यांनी बुधवार  भारतीय वेळेनुसार पहाटे 4.20 च्या सुमारा राष्ट्राला संबोधित करताना सांगितले. त्यांनी म्हटलं की, "मी लगेचच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. अद्याप कोरम पूर्ण झालेला नाही. कोरम पूर्ण होताच मार्शल लॉ मागे घेतला जाईल. युन यांच्या भाषणानंतर सुमारे 30 मिनिटांनी पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आणि लष्करी कायदा उठवण्यास मान्यता देण्यात आली. संबंधित कायद्यानुसार मार्शल लॉ काढण्याची ही प्रक्रिया आहे.


लोकांच्या विरोधापुढे राष्ट्राध्यक्षांना झुकावं लागलं


दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री 10.20 वाजता मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा होताच अवघ्या सहा तासांतच देशांत प्रचंड खळबळ माजली... या घोषणेनंतर विरोधी पक्षाचे खासदार आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले.देशातील नागरिकांच्या विरोधापुढे राष्ट्राध्यक्षांना झुकावं लागलं आणि त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. 


राष्ट्रपतींच्या आदेशाच्या विरोधात विरोधकांनी मतदान केलं मतदान


मंगळवारी संध्याकाळी राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर "राज्यविरोधी शक्तींचा नायनाट करण्यासाठीची गरज सांगून मार्शल लॉ लागू केला. त्यामुळे देशालाच मोठा धक्का बसला. या घोषणेनंतर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांच्या खासदारांनी मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास विधानसभेचे तातडीचे पूर्ण अधिवेशन बोलावले. 300 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व 190 खासदारांनी राष्ट्राध्यक्ष यून यांच्या मार्शल लॉच्या घोषणेच्या विरोधात मतदान केले. कोरियाच्या मुख्य विरोधी डेमोक्रॅटिक पार्टीसह उदारमतवादी पक्षांनी यावेळी नॅशनल असेंब्लीमध्ये बहुतांश जागा जिंकल्या.


दुसरीकडे मार्शल लॉ मागे घेतल्यानंतर यासाठी तैनात केलेले सैनिक आपल्या तळावर परतले आहेत. दक्षिण कोरियाच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 4:22 पर्यंत सर्व सैन्य त्यांच्या तळांवर परतले. 


ही बातमी वाचा : 


South Korea: दक्षिण कोरियातील राजकारणात खळबळ, राष्ट्राध्यक्षांनी लागू केला 'मार्शल लॉ;' नेमकं काय घडलंय?