Seema Haider Sachin Meena Story: प्रेमासाठी बेकायदेशीरपणे भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदरची (Seema Haider) लव्ह स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. सीमाने प्रियकर सचिन मीणासोबत लग्न केलं असून ती आपल्या 4 मुलांसह नोएडा येथे राहत आहे. पण सीमा आल्यामुळे मीडियामध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळे सचिनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडल्याचं सचिनच्या परिवाराचं म्हणणं आहे. सचिनची नोकरी देखील हातातून गेली असून खाण्या-पिण्याच्या समस्येचाही त्यांना सामना करावा लागतोय.


सचिनच्या वडिलांनी लिहीलं पोलिसांना पत्र


देशापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या प्रकरणामुळेच आता हे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडलं आहे. सीमा हैदर, सचिन मीणा आणि त्याचं कुटुंब सध्या उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहत आहे. कुटुंबाला भेडसावत असणाऱ्या समस्येबाबत सचिनच्या वडिलांनी पोलिसांना पत्र लिहिलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सचिनचे वडील नेत्रपाल यांनी वरिष्ठ पोलिसांना एक पत्र लिहिलं आहे, ज्यामध्ये कुटुंबाला खाण्यापिण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या हे कुटुंब पोलिसांची मदत घेत आहेत.


शेतकरी नेत्याने दिला पोलिसांना पत्र लिहिण्याचा सल्ला 


रिपोर्टनुसार, शेतकरी नेते मास्टर स्वराज यांनी सचिनच्या वडिलांना पोलिसांना पत्र लिहिण्यास सांगितलं होतं. भारतीय किसान युनियन लोकशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष, मास्टर स्वराज यांनी शनिवारी (29 जुलै) सीमा आणि सचिन यांची ग्रेटर नोएडा येथील रबुपुरा येथील त्यांच्या नवीन घरी भेट घेतली होती.


शेतकरी नेते मास्टर स्वराज म्हणाले...


शेतकरी नेते म्हणाले, मी सचिन आणि सीमा हैदर यांना भेटायला आलो होतो. ते नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, परंतु ते त्यांच्या घरातच अडकले आहेत. त्यांच्या घराबाहेर मीडियाच्या लांबच लांब रांगा लागल्याने त्यांना घराबाहेर पडणं आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. हे जोडपं सतत पोलिसांच्या रडारवर असतं. हे समजल्यानंतर शेतकरी नेत्याने सचिनच्या कुटुंबाला पोलिसांना पत्र लिहिण्याचा सल्ला दिला.


सचिनच्या कुटुंबाला होत असलेल्या त्रासामुळे सीमा अस्वस्थ!


सीमाने भारतात तिच्या बेकायदेशीर प्रवेशाचा उल्लेख करताना सांगितलं की, तिला सचिनच्या कुटुंबासमोर निर्माण होत असलेल्या समस्यांबद्दल काळजी वाटते. तपासामुळे सचिनच्या कुटुंबियांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे, त्याचं तिला वाईट वाटत आहे आणि त्यामुळे ती अस्वस्थ झाली आहे.


सुरक्षा यंत्रणेकडून सीमाची चौकशी सुरू


पाकिस्तानची 30 वर्षीय सीमा हैदर कोरोनाच्या काळात ऑनलाईन गेम पबजीच्या माध्यमातून ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या 22 वर्षीय सचिन मीणाच्या संपर्कात आली. सचिनसोबत लग्न करण्यासाठी ती पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाली. सीमा हैदरला 4 जुलै रोजी पोलिसांनी पकडलं आणि तेव्हापासून तिला सुरक्षा यंत्रणांच्या चौकशीला सामोरं जावं लागत आहे. ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


सीमाने यापूर्वी पाकिस्तानातील गुलाम हैदरशी लग्न केलं होतं, त्यांना चार मुलं आहेत. सीमा या चारही मुलांना घेऊन सचिनसोबत राहण्यासाठी भारतात आली, सध्या ती जामिनावर बाहेर आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


India: सीमा हैदर प्रेमप्रकरण गाजत असताना राजस्थानची अंजू पाकिस्तानात; प्रियकरासाठी वाट्टेल ते!