Pakistan Blast: पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील (Khyber Pakhtunkhwa) बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमध्ये आज (30 जुलै) जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) च्या अधिवेशनात झालेल्या स्फोटक हल्ल्यात किमान 20 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात 50 हून अधिक जण जखमी झाले. हल्ल्याची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. यावेळी रॅलीत अनेकांची उपस्थिती होती. समर्थकांमध्येच हल्लेखोर उपस्थित होते, असे मानले जात आहे. त्यामुळे हा आत्मघाती हल्ला मानला जात आहे.
बाजौर जिल्हा आपत्कालीन अधिकारी साद खान यांनी पाकिस्तानी इंग्रजी दैनिक 'डॉन'ला माहिती देताना मृतांची आणि जखमींच्या संख्येची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, खारमधील जेयूआय-एफचे प्रमुख नेते मौलाना झियाउल्लाह जान यांचाही स्फोटात मृत्यू झाला. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, जखमींना पेशावर आणि टाइमरगेरा येथील रुग्णालयात हलवले जात आहे. जखमींमध्ये स्थानिक पत्रकाराचा समावेश आहे.
JUI-F चे नेते हाफिज हमदुल्ला हे या रॅलीला संबोधित करणार होते. मात्र, काही कारणास्तव ते येथे पोहोचू शकले नाहीत. नंतर मीडियाशी संवाद साधताना हाफिज म्हणाले की, या स्फोटात आमचे सुमारे 35 कार्यकर्ते ठार झाले आहेत. मी या घटनेचा निषेध करतो. अशा हल्ल्यांनी आमचे मनोबल खचणार नाही. हाफिज पुढे म्हणाले की, असे हल्ले यापूर्वीही होत आले आहेत. त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. आम्हाला कोणत्याही प्रकारची सुरक्षाही दिली जात नाही. हा मुद्दा आम्ही संसदेत मांडू.
या घटनेनंतर JUI-F प्रमुख मौलाना फजल यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी बोलून त्यांना सविस्तर माहिती दिली. सरकारनेही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी हा हल्ला म्हणजे देशाला कमकुवत करण्याचे आणखी एक षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते.
इतर महत्वाच्या बातम्या