Scheduled International Flights Suspended: भारतातील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांचे निलंबन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आले आहे, असे विमान वाहतूक नियामक DGCA ने स्पष्ट केले आहे. यामुळे 23 मार्च 2020 पासून भारतात लागू करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाण बंदी अद्याप कायम आहे. तथापि, काही विशेष प्रवासी उड्डाणे भारत आणि अंदाजे 40 देशांदरम्यान जुलै 2020 पासून हवाई बबल व्यवस्थेअंतर्गत कार्यरत आहेत.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, "प्राधिकरणाने 28 फेब्रुवारी 2022 च्या भारतीय वेळेनुसार 23:59 वाजेपर्यंत/भारतातून नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवांचे निलंबन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे." मात्र, हे निर्बंध आंतरराष्ट्रीय सर्व-कार्गो ऑपरेशन्स आणि विशेषत: DGCA ने परवानगी दिलेल्या फ्लाईट्सना लागू होणार नाहीत, असे त्यात नमूद केले आहे.
हवाई बबल कराराअंतर्गत प्रवास सुरु
अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बहारीन, बांगलादेश, भूतान, कॅनडा, इथिओपिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इराक, जपान, कझाकिस्तान, केनिया, कुवेत, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, कतार, रशिया, रवांडा, सौदी अरेबिया, सेशेल्स, सिंगापूर, श्रीलंका, स्वित्झर्लंड, टांझानिया, युक्रेन, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि उझबेकिस्तान या देशांसोबत भारताचा हवाई बबल करारा अंतर्गत प्रवास सुरु आहे. या करारात काही अटी आणि शर्तींनुसार हे देश हवाई प्रवासाला परवानगी देतात. हवाई प्रवास बबल करारांतर्गत समाविष्ट नसलेल्या देशांना थेट हवाई प्रवास करण्याची परवानगी नाही.
ओमिक्रॉनने चिंता वाढवली!
24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेत प्रथमच आढळलेल्या ओमायक्रॉन या व्हेरियंटने आंतरराष्ट्रीय प्रवाशांमार्फत भारतात शिरकाव केल्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.
एअर बबल करारांतर्गत उड्डाणांवर बंदी घालण्यात आली नाही. परंतु, भारताने काही देशांना 'हाय रिस्क' यादीत सामील केले आहे. या यादीत यूके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, घाना, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, टांझानिया, हाँगकाँग, इस्रायल, काँगो, इथिओपिया, कझाकिस्तान, केनिया, नायजेरिया, ट्युनिशिया आणि झांबिया यासह युरोपातील सर्व देशांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या:
- Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 39 हजार 207 कोरोनाबाधितांची नोंद तर 53 जणांचा मृत्यू
- Mumbai Corona Update : मुंबईत 6 हजार 149 नवे कोरोनाबाधित, तर 12 हजार 810 जण कोरोनामुक्त
- शाळा सुरु करण्याच्या निर्णयासह मुंबईतील रुग्णसंख्या खरचं कमी होतेय का?, पालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha