Vijay Mallya : भारतीय बँकाचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याला ब्रिटनच्या न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. विजय मल्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला लंडनमधील आलिशान घरातून बाहेर काढण्याचे आदेश ब्रिटनच्या न्यायालयाने दिले आहेत. स्विस बँक यूबीएसकडून मल्याच्या घराचा ताबा घेतला जाणार आहे. मल्ल्याच्या कुटुंबाने न भरलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आणखी वेळ देण्याचे कोणतेही कारण नाही, असा निकाल ब्रिटनच्या न्यायालयाने दिला. उच्च न्यायालयाने या प्रकरणी गेल्या आठवडयात मल्ल्याच्या कोटयवधी पौंडांच्या आलिशान घराचा ताबा देण्याच्या आदेशाला स्थगिती द्यायची की नाही यावर निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आता ब्रिटनच्या न्यायालयाने निर्णय दिला आहे. 


दरम्यान, मंगळवारी यावर सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने विजय मल्यासह त्याचा मुलगा सिद्धार्थ आणि आई ललिता यांना लंडनमधील हे घर ताबडतोब सोडण्याचे आदेश दिले आहेत. भारतातून फरार झाल्यापासून मल्या हा लंडनमधील याच घरात वास्तव्याला असून, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड येथे नोंदणीकृत कंपनीची या घरावर मालकी आहे. 2012 मध्ये हे घर मल्याने पाच वर्षे मुदतीचे 2.04 कोटी पौंडाचे कर्ज मिळविण्यासाठी यूबीएसकडे गहाण ठेवले होते. 25 मार्च 2017 ला कर्जाची मुदत उलटूनही परतफेड न झाल्याने यूबीएसने न्यायालयात दावा दाखल केला होता. अनेक प्रकारच्या दिरंगाईनंतर अखेर यूबीएसच्या बाजूने कौल आला आहे. मल्ल्याच्या कुटुंबाला न भरलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आणखी वेळ देण्याचे कोणतेही कारण नाही, असा निकाल ब्रिटनच्या न्यायालयाने दिला.


बँक फसवणूक प्रकरणात 2017 साली पहिला खुलासा करण्यात आला. मद्य व्यावसायिक आणि किंगफिशर विमान कंपनीचा मालक असलेल्या विजय मल्ल्याने आयडीबीआय आणि अन्य काही बँकांचे मिळून 9000 कोटींचे कर्ज बुडवल्याचे उघड झाले. त्यानंतर पळून गेलेला विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये राहात आहे. मल्ल्याला भारताकडे सोपवण्यात यावं, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत. इंग्लंडच्या न्यायालयातही मल्ल्याविरोधात केस चालू आहे. दरम्यान मल्याला घराबाहेर काढले जाणे हे त्याच्या भारतातील प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेस मदतकारकच ठरणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: