Mumbai Corona : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा स्फोट झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी 15 ते 20 हजारांच्या घरात रुग्ण सापडू लागले होते. पण मागील आठवड्यापासून हा वेग काहीसा मंदावल्याने प्रशासन आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण नेमकी ही कोरोना रुग्णांची लाट कमी झाली आहे का? हे सांगण्यासाठी अजून दोन-तीन दिवस वाट पाहावी लागेल असं मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे.


तसंच बूस्टर डोस आणि 15 ते 18 वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणाबाबत बोलताना ते म्हणाले. 'बूस्टर डोससाठी सेंटरची संख्या वाढवली आहे. तसंच 15 ते 18 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी शाळा, कॉलेजात कॅम्प आयोजित करत आहोत. 350 लसीकरण सेंटर्स सुरू केली आहेत. मुलांसाठी वेगळे काऊंटर किंवा वेगळे सत्र ठेवले गेले आहेत.


'शाळा सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ'


शाळा सुरु करण्याबाबत बोलताना काकाणी म्हणाले, 'मुंबईच्या कोरोनाची स्थिती, आरोग्य व्यवस्था, लसीकरण यासंदर्भाची स्थिती आम्ही राज्य सरकारला देवू. शाळा सुरू करावी की नाही, याचा अहवाल आम्ही लवकरच टास्क फोर्सला पाठवू.'


 पुढे मुंबईतील रुग्णसंख्येबाबत बोलताना काकाणी म्हणाले, 'सध्या डेल्टा व्हेरियंट कमी होऊन ओमायक्रॉन वाढत आहे. तसंच तिसऱ्या आठवड्यात लाट कमी व्हायला सुरूवात होईल असं तज्त्रांनी म्हटलं होतं. आता उतरणीचा कल कायम राहणार का? यासाठी दोन तीन दिवस वाट पाहावी लागेल.'


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha