Sad Leave : मनुष्याच्या भावना या क्षणाक्षणाला बदलतात. आता हसणारा माणूस पुढच्या पाच दहा मिनिटात रडेल की आणखी काय करेल सांगता येत नाही. अशाही परिस्थितीत आपल्यापैकी अनेकांना भावनांना आणि दुःखाला आवर घालून कामावर जावं लागतं, पण कामावर लक्ष लागेल हे मात्र कुणी सांगू शकत नाही. पण चीनमधील एक कंपनी अशीही आहे की त्याच्या कर्मचाऱ्यांना सॅड लीव्ह देते. म्हणजे एखादा कर्मचारी उदास असेल किंवा दुःखात असेल तर त्याला सुट्टी दिली जाते.
आपल्यापैकी अनेकजण दररोज ऑफिसला जातात आणि कठोर परिश्रम करतात. पण माणसालाही भावना असतात. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा मनात अशांतता असते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या समस्यांनी घेरलेली असते, त्यावेळी तिला कामावर जावसं वाटत नाही. सर्वकाही सोडून द्यावंसं वाटतं.
मात्र ऑफिसच्या कामावर, तिथून मिळणाऱ्या पगारावर घर चालतं. त्यामुळे लोक अनिच्छेने कामावर जातात. कारण दुःखी असणं हे आजारी असण्याइतपत धोकादायक नाही अशी आपली समजूत असते. कंपनीही त्याचा कधीही विचार करत नाही. एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दु:खी झाल्यास सुटी घेण्याची तरतूद केली आहे.
चीनी कंपनी एका वर्षात 10 सुट्ट्या देणार
भारतातील बिग बझार प्रमाणेच चीनमध्ये फॅट डोंग लाइ या नावाची एक सुपरमार्केट कंपनी आहे. चीनच्या हैनान प्रांतात या कंपनीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरला आहे. ही कंपनी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याचे कारण कंपनीचा व्यवसाय नसून कंपनीचे नवीन रजा धोरण आहे.
फॅट डोंग लाई कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दुःखद सुट्टी म्हणजे सॅड लीव्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत तुम्ही कॅज्युअल लीव्ह, सिक लीव्ह बद्दल ऐकले असेल पण सॅड लीव्ह म्हणजे काय? फॅट डोंग लाई कंपनीच्या मालकाने कंपनीचे कर्मचारी नाराज असल्यास त्यांना दरवर्षी 10 दुःखद सुट्ट्या देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रजा तो वर्षभरात कधीही घेऊ शकतो.
फॅट डोंग लाइ दरवर्षी 40 रजा देतात
फॅट डोंग लाई कंपनी चीनमधील इतर कंपन्यांपेक्षा खूपच वेगळी आहे. कर्मचारी एका वर्षात 40 दिवस रजा घेऊ शकतात. कंपनीचे कर्मचारी आठवड्यातून 5 दिवस काम करतात आणि तेही 7 तासांसाठी. जर आपण चीनमधील इतर कंपन्यांबद्दल बोललो तर, बहुतेक कंपन्या 6 दिवस आणि 12 तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात.
हैनान प्रांतात फॅट डोंग लाईची एकूण 12 दुकाने आहेत. याआधीही कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना परदेशी सुट्टीवर पाठवण्याची घोषणा केली होती. ती घोषणा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाली होती. फॅट डोंग लाईची नवीन दुःखी रजा पॉलिसी देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही बातमी वाचा;