कीव: युक्रेनवरचा हल्ला रशियाने आता अधिक तीव्र केला असून रशियाचे सैन्य आता युक्रेनची राजधानी कीवच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. राजधानी कीवपासून अवघ्या तीन मैलावर रशियाचे सैन्य आल्याचं युक्रेनच्या सैन्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच राजधानी कीवचा पाडाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 


रशियाने हवाई दलाच्या माध्यमातून कीववर हल्ला सुरू ठेवला असून त्यामुळे या शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच बेसमेंट किंवा इतर भूयारांमध्ये सुरक्षित रहावं असं आवाहन युक्रेनच्या सैन्याने केलं आहे. 


शुक्रवारी सकाळपासूनच राजधानी कीवच्या आजूबाजूच्या परिसरात बाँम्बच्या धमाक्यांचे आवाज ऐकू येत आहेत. रशियन सैन्याने आपला हल्ला अधिक वेगवान केला आहे. 


युक्रेनच्या अध्यक्षांचे जगभरातील देशांना आवाहन
युक्रेनमधील लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून लावण्याचा आणि देशावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रशियाचा असून त्या विरोधात जगभरातील देशांनी युक्रेनच्या मदतीला यावं असं आवाहन युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी केलं आहे. तसेच अमेरिका आणि युरोपने रशियावरील आर्थिक निर्बंध हे अधिक कडक करावेत अशीही मागणी त्यांनी केली आहे. 


दरम्यान, युक्रेनने शस्त्रं खाली टाकल्यास आपण चर्चेसाठी तयार असल्याचं रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी स्पष्ट केलं आहे. तसं झाल्यास शिया आपले एक शिष्टमंडळ चर्चेसाठी युक्रेनला पाठवणार आहे. रशिया हा काही 'नव-नाझी' नसून युक्रेनच्या लोकांनी स्वातंत्र्याचा श्वास घ्यावा यासाठी रशियाने ही लष्करी कारवाई केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


संबंधित बातम्या: