Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनधील युद्धाचा आजचा दुसरा दिवस आहे. दोन दिवसांत दोन्ही देशाचे मोठे नुकसान झाले. शिवाय या दोन्ही देशांतील वाढत्या तणावाचा जगभरातील इतर देशावरही मोठा परिमाण झाला आहे. दरम्यान, आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. युक्रेनच्या सैनिकांनी शरणागती पत्करली तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असं वक्तव्य लावरोव यांनी केलं आहे.

  


"रशियाला युक्रेन 'अत्याचारापासून मुक्त' हवा आहे. युक्रेन अत्याचारापासून मुक्त झाला तर युक्रेनियन लोक त्यांचे भविष्य ठरवू शकतील. अशा परिस्थितीत रशिया गप्प बसू शकत नाही. युक्रेनच्या सरकारला लोकशाही सरकार मानण्याची कोणतीही संधी आम्हाला सध्या दिसत नाही, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री लावरोव यांनी केले आहे.  


आज युद्धाच्या दुसऱ्या दिवशी रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवपर्यंत पोहोचले आहे. परंतु, रशियन सैन्याला रोखण्यासाठी तेतरीव नदीवरील पूल पाडण्यात आला आहे. रशियाचे रणगाडे युक्रेमध्ये घुसू नये यासाठी युक्रेनच्या लष्कराने हे पाऊल उचलले आहे. 


एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्य ईशान्य आणि पूर्वे मार्गे युक्रेनची राजधानी कीवकडे जात आहे. तर रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, कीव अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. लष्करी कारवाई टाळण्यासाठी त्यांना असे करण्यास सांगितले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनला रशियावर दबाव वाढवण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याचे आवाहन केले आहे. 


दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने आता मोठा दावा केला आहे. आतापर्यंत 243 युक्रेनियन सैनिक आणि एक मरीन ब्रिगेडने आत्मसमर्पण केले आहे. युक्रेनच्या 118 लष्करी पायाभूत सुविधा देखील नष्ट केल्या आहेत. यामध्ये 11 लष्करी हवाई क्षेत्रे, 13 कमांड आणि कम्युनिकेशन केंद्रे, 14S 300 क्षेपणास्त्र प्रणाली आणि 36 रडार स्टेशन यांचा समावेश आहे, असा दावा संरक्षण मंत्रालयाने केला आहे. याबरोबरच युक्रेनची पाच लढाऊ विमाने, एक हिलिकॉप्टर, पाच ड्रोन, 18 रणगाडे, 7 रॉकेट लॉन्चर, लष्कराच्या 41 गाड्या आणि 5 लढाऊ नौका नष्ट केल्याचा दावा रशियाने केला आहे.  याबरोबरच चेरनोबिल अणू प्रकल्पाचा गुरुवारी ताबा घेतला असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गळती नाही, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या