Russia Ukraine War : गेल्या दोन दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. यात दोन्ही देशाचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, आता ही युद्धजन्य परिस्थिती निवळण्याची शक्यता आहे. कारण रशिया युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार झाला आहे. त्यासाठी रशिया आपले एक शिष्टमंडळ चर्चेसाठी युक्रेनला पाठवणार आहे. हे शिष्टमंडळ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. 


रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. चीनने याबाबतची माहिती दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. पुतिन म्हणाले की, ते युक्रेनसोबत उच्चस्तरीय चर्चेसाठी तयार आहेत. याआधी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतीन यांना चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता, त्यावर त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. 


दरम्यान, या आधी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव म्हणाले होते की, युक्रेनचे सैन्य शरण आले तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. रशियाला युक्रेनला "अत्याचारापासून" मुक्त करायचे आहे. जेणेकरून युक्रेनचे लोक त्यांचे भविष्य ठरवू शकतील. अशा परिस्थितीत रशिया गप्प बसू शकत नाही. युक्रेनच्या सरकारला लोकशाही सरकार मानण्याची कोणतीही संधी आम्हाला सध्या दिसत नाही."  


दरम्यान, आज युद्धाच्या दुसऱ्या दिवशी रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवपर्यंत पोहोचले आहे. परंतु, रशियन सैन्याला रोखण्यासाठी तेतरीव नदीवरील पूल पाडण्यात आला आहे. रशियाचे रणगाडे युक्रेमध्ये घुसू नये यासाठी युक्रेनच्या लष्कराने हे पाऊल उचलले आहे. 


एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्य ईशान्य आणि पूर्वे मार्गे युक्रेनची राजधानी कीवकडे जात आहे. तर रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, कीव अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. लष्करी कारवाई टाळण्यासाठी त्यांना असे करण्यास सांगितले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनला रशियावर दबाव वाढवण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याचे आवाहन केले आहे. 


महत्वाच्या बातम्या