Russia Ukraine War: युक्रेनने शस्त्रं खाली टाकल्यास आपण चर्चेसाठी तयार असल्याचं रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी स्पष्ट केलं आहे. रशिया हा काही 'नव-नाझी' नसून युक्रेनच्या लोकांनी स्वातंत्र्याचा श्वास घ्यावा यासाठी रशियाने ही लष्करी कारवाई केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. 


रशियाचे परराष्ट्रमंत्री म्हणाले की, युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की हे खोटारडे असून त्यांनी रशियासमोर कोणताही चर्चेचा प्रस्ताव ठेवला नाही. सध्याच्या युक्रेन सरकारला रशियाकडून लोकशाही सरकारचा दर्जा मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. 


दुसरीकडे रशियन वृत्तसंस्थेने दावा केला आहे की युक्रेन चर्चेसाठी तयार आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी झेलेन्स्की यांना चर्चेसाठी आमंत्रित केल्याचीही माहिती समोर येत आहे.  तर दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की हे भूमिगत झाल्याचं सांगण्यात येतय. 


रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवपर्यंत धडकले आहेत. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी उपमंत्री हाना मल्यार यांचा हवाला देत 800 रशियन सैनिक मारल्याचा दावा केला. एका अधिकृत ट्वीटद्वारे मंत्रालयाने म्हटले आहे की, युक्रेनने सात रशियन विमाने, हेलिकॉप्टर, 30 हून अधिक रणगाडे,  130 हून अधिक बीबीएम नष्ट केले आहेत. 


रशियासोबत दोन हात करण्यासाठी आम्हाला एकटं सोडण्यात आलं असल्याचे युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलन्स्की यांनी म्हटलं आहे. झेलन्स्की यांनी देशाला संबोधित करणारा एक व्हिडीओ मेसेज प्रसिद्ध केला आहे. या युद्धात जगाकडूनही युक्रेनला मदत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या बाजूने लढण्यासाठी कोण उभं आहे? मला एकही देश युक्रेनच्या बाजूने दिसत नाही. युक्रेनला नाटोचं सदस्यत्व देण्याची हमी कोण देण्यास तयार आहे? प्रत्येकजण घाबरत असल्याचे त्यांनी सांगितले. 


संबंधित बातम्या: