Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी कीव्हच्या उत्तर-पश्चिम उपनगरातील इरपिन येथे रविवारी एका अमेरिकन पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात अमेरिकेच्या ब्रेंट रेनॉड या पत्रकाराचा मृ्त्यू झाला तर एक पत्रकार जखमी झाला आहे, असा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.  


ब्रेंट रेनॉड हे इरपेनमध्ये युक्रेनमधून बाहेर जाणाऱ्या निर्वासितांचे चित्रीकरण करत होते. यावेळी रशियन सैनिकांनी त्यांच्या व्हॅनवर गोळीबार केला. यावेळी रेनॉड यांच्यासोबत इतर परदेशी पत्रकारही होते. रशियन सैनिकांनी रेनॉड यांच्या मानेवर गोळी झाडली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती या गोळीबारातून  वाचलेल्या एका अमेरिकन पत्रकाराने दिली आहे. 


युक्रेनियन पोलिसांनी रेनॉड यांच्या मृत्यूची नोंद केली असून ते रशियन सैन्याचा "निर्दयीपणा दाखविण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांची हत्या केल्याचे युक्रेनने म्हटले आहे. दरम्यान ब्रेंटजवळ न्यूयॉर्क टाइम्सचा बॅज सापडला आहे. परंतु, न्यूयॉर्क टाइम्सने या संदर्भात एक निवेदन जारी करून बेंटर हे युक्रेनमधील न्यूयॉर्क टाइम्ससाठी नियुक्तीवर नव्हते, असे म्हटले आहे. 




"अमेरिकन पत्रकार ब्रेंट रेनॉड यांच्या मृत्यूने खूप दुःख झाले आहे. ब्रेंट एक प्रतिभावान छायाचित्रकार आणि चित्रपट निर्माता होता. परंतु तो युक्रेनमधील न्यूयॉर्क टाइम्ससाठी नियुक्तीवर नव्हता." असे ट्विट न्यूयॉर्क टाइम्सचे व्यवस्थापकीय संपादक क्लिफ लेव्ही यांनी केले आहे. "ब्रेंटचे जाणे भयंकर नुकसानकारक आहे. ब्रेंटसारखे धाडसी पत्रकार रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील विध्वंस आणि दुःख जगापर्यंत पोहोचवण्यासाठी जोखीम पत्करतात. परंतु, दुर्देवाने यात त्याचा मृत्यू झाला" असे क्लिफ लेव्ही यांनी म्हटले आहे.


महत्वाच्या बातम्या