Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन दरम्यान घनघोर युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने केलेल्या आक्रमणाला युक्रेनच्या सैन्याकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. या युद्धात रशियाचे 4300 हून अधिक सैन्य ठार झाले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर, युक्रेनच्या सैनिकांनी 200 रशियन सैनिकांना युद्धबंदी केले असल्याचे म्हटले आहे. 


संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत युक्रेनही माहिती दिली. युक्रेनने म्हटले की, रशियाचे 4300 सैनिक ठार झाले आहेत. या य़ुद्धात आतापर्यंत रशियाचे 146 रणगाडे, 27 विमान आणि 26 हेलिकॉप्टर पाडले असल्याचे असल्याचे युक्रेनने म्हटले. युक्रेनने रशियन सैनिकांच्या नातेवाईकांसाठी एक हॉटलाइन सुरू केली होती. यामध्ये त्यांच्याशी संपर्क साधता येईल. एका तासामध्ये जवळपास 100 हुन अधिक सैनिकांच्या आई-वडिलांकडून फोन आले होते, अशी माहिती युक्रेनने दिली. रशियाने युक्रेनने केलेले सर्व दावे फेटाळून लावले आहेत.


116 मुलांसह 1684 नागरीक जखमी 


रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 116 लहान मुलांसह 1684 नागरीक जखमी झाले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. मात्र, किती सैनिकांना प्राण गमवावे लागले, याबाबत युक्रेन सरकारने कोणतीही माहिती दिली नाही. 


UNGA ची आपात्कालीन बैठक


संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत एक आपात्कालीन विशेष सत्र बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत याबाबतच्या प्रस्तावाच्या बाजूने 11 मते पडली. तर, रशियानेच याच्या विरोधात मतदान केले. भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीने या मतदानात सहभाग घेतला नाही. 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी ही बैठक होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघात 1950 पासून आतापर्यंत 10 विशेष आपात्कालीन सत्र बोलावण्यात आले होते. सोमवारी होणार ही बैठक 11 वी बैठक असणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha