Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना पोलंड सीमामार्गे मायदेशी आणण्यात येणार आहे. पोलंड-यूक्रेनवरील shehyni-medkya सीमेवरील अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी पोलंडमधील भारतीय दूतावासाकडून प्रयत्नांना सुरुवात झाली आहे.
अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थी मागील ३ दिवसांपासून पोलंड सीमेवर अडकून, अनेकांकडून परराष्ट्र मंत्रालयाला गैरसोय होत असल्याची माहिती पोहोचवण्यात आली होती. आज, 28 फेब्रुवारीपासून सकाळपासून १० बसेस यूक्रेनच्या बाजूने भारतीय नागरिकांना पोलंडच्या सीमेवरुन बाहेर काढण्यासाठी दाखल होणार असल्याची माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे.
पोलंडच्या दुसऱ्या चेकपॉईंटवर दूतावासाकडून नागरिकांना नेण्यात येणार आहे. या भारतीय नागरिकांची राहण्याची व्यवस्था देखील दूतावासाकडून पोलंडमधील Rszeszowमध्ये करण्यात येणार आहे.
आपली सीट बुक करण्यासाठी नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्याच्या सूचना पोलंडमधील भारतीय दूतावासाने केल्या आहेत. आरक्षण न झाल्यास घाबरुन न जाता शांती बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युक्रेन-पोलंडच्या सीमेवरुन भारतीयांना बाहेर काढेपर्यंत ही मोहीम सुरुच राहणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी पोलंडच्या सीमेवर जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रविवार संध्याकाळपासून करण्यात आली आहे. भारत सरकारकडून सर्व नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून सर्व सेवा मोफत असणार आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना पोलंड सीमेवर धक्काबुक्की
काही विद्यार्थी युक्रेनमधून पोलंडला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, युक्रेनवरून पोलंडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलंड सीमेवर पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही विद्यार्थ्यांनी या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. युक्रेनियन सैनिक आणि पोलीस पोलंडच्या सीमेवरून हवेत गोळीबार करत असल्याचा दावा काही व्हिडिओतून दिसून आला. पोलंड सीमेवरून या विद्यार्थ्यांना परत युक्रेनमध्ये नेण्याचा प्रयत्न होत असून काही विद्यार्थ्यांना मारहाणनही करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. भारताने सुरक्षेबाबत रविवारी युक्रेन आणि रशियाकडे आपली चिंता व्यक्त केली. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, भारतीय नागरिकांची सुरक्षितेसाठी आणि युक्रेनमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारताने जिनिव्हास्थित इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसशी (ICRC) संपर्क साधला आहे. श्रृंगला यांनी सांगितले की, 'परराष्ट्र व्यवहार मंत्रालय युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेला परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या थेट देखरेखीखाली आणि पंतप्रधानांच्या सूचनेनुसार सर्वोच्च प्राधान्य देत आहे.'
इतर महत्त्वाच्या बातम्या: