Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवरील आपला हल्ला अधिक तीव्र केल्यानंतर आता युक्रेनने युरोपियन युनियनकडे पु्न्हा एकदा मदतीची साद घातली आहे. याचाच एक भाग म्हणून युक्रेन आता युरोपियन युनियनचा सदस्य होणार हे निश्चित झालं आहे.
युरोपियन युनियनने युक्रेनचा सदस्यत्वासाठीचा अर्ज स्वीकारला आहे. त्यामुळे युरोपियन युनियनच्या सदस्यत्वाचा मार्ग युक्रेनसाठी खुला झाला असून त्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज रात्री 9 वाजता यावर मतदान होणार आहे आणि त्यानतर घोषणा होणार आहे.
युरोपियन युनियनच्या महासभेत युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात लढण्याचा ठाम निर्धार केला. युरोपियन युनियनमध्ये बोलताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की भावूक झाले होते. त्यांच्या या निर्धाराला युरोपियन युनियनने स्टॅन्डिंग ओव्हेशन दिलं.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आज युरोपियन युनियनच्या विशेष बैठकीसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आवेशपूर्ण भाषण केलं. यावेळी बोलताना झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्यावर कठोर शब्दांत निशाणा साधला. युक्रेनमधील सर्व शहरं बंद झाली आहेत, पण तरी देखील कुणीही आम्हाला तोडू शकत नाही. आम्ही मजबूत आहोत अशा भाषेत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना सुनावलंय.
युरोपियन युनियन आमच्या सोबत आहे हे आता त्यांनी सिद्ध करावं, आम्हाला एकटं सोडणार नाही हे सिद्ध करावं असंही आवाहन झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनला केलं आहे.