Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. यातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी युक्रेनमधील बुका शहरात क्रूर कृत्या केल्याचा आरोप असलेल्या ब्रिगेडला मानद पदवी प्रदान केली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. युक्रेनमधील बुका येथे रशियन सैनिकांनी नरसंहार  केल्याचा आरोप युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला होता.  


युक्रेनच्या बुका शहरात सामूहिक कबरी आणि मृतदेहाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त होत असून अनेक देशांनी या घटनेचा निषेध करत चौकशीची मागणी केली आहे.


बुकामधील या घटनेनंतर 193 सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेने रशियाला UNHRC मधून निलंबित करण्यासाठी अमेरिकेने आणलेल्या ठरावाच्या मसुद्यावर मतदान केले. युक्रेनची राजधानी किव्ह जवळच्या शहरांमधून परतणाऱ्या रशियन सैनिकांनी नागरिकांची हत्या केल्याच्या आरोपांबाबत हा ठराव आणण्यात आला होता. ठरावाच्या बाजूने 93 मते पडली तर विरोधात 24 मते पडली. महासभेचे 58 सदस्य देश मतदानास अनुपस्थित होते.


दरम्यान, रशियाने सोमवारी दावा केला की, रशियाने हवाई दल, क्षेपणास्त्र दल, तोफखाना आणि हवाई संरक्षण प्रणालीचा वापर करून युक्रेनमधील लष्करी तळांवर रात्रभर मोठ्या प्रमाणात हल्ले केले. त्यामुळे खार्किव, झापोरिझ्झ्या, डोनेस्तक, निप्रॉपेट्रोव्हस्क प्रदेश आणि मायकोलायव्हमध्ये मोठे नुकसान झाले आहे. तर युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या अनेक सैनिकांना ठार करून रशियाचे मोठे नुकसान केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. 


दरम्यान, दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा परिणाम होत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये या महागाईचा भडका वाढला आहे.   


महत्वाच्या बातम्या