Jahangirpuri Violence Update : दिल्लीतील जहांगीरपुरी येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी तोडफोडही करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, कटाचा भाग म्हणून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. 'एबीपी न्यूज'कडे एफआयआरची प्रत देखील आहे, ज्यामध्ये या प्रकरणाची संपूर्ण माहिती आहे.


एफआयआरनुसार, संध्याकाळी 6 वाजता मिरवणूक जामा मशिदीजवळ पोहोचताच अन्सार नावाचा एक व्यक्ती त्याच्या चार ते पाच साथीदारांसह आला आणि मिरवणुकीत सहभागी लोकांशी वाद घालू लागला. बाचाबाची वाढत गेल्यानं परिस्थिती चिघळली आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. यानंतर रस्त्यांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ सुरू झाली. लाठ्या, तलवारी घेऊन लोक रस्त्यावर आले.


या घटनेला 2 दिवस झाले असून यामध्ये आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली, किती जणांना अटक करण्यात आली, जाणून घ्या संपूर्ण माहिती...



  • याप्रकरणी आतापर्यंत 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 4 जण एकाच कुटुंबातील आहेत. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. 3 पिस्तूल आणि 5 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

  • एफआयआरच्या प्रतीनुसार, आरोपी अन्सारच्या जुलूसमधील लोकांशी झालेल्या वादानंतर गोंधळ झाला. कोर्टात पोलिसांनी सांगितले की, कट रचून मिरवणुकीवर दगडफेक झाली. रोहिणी न्यायालयाने मुख्य आरोपी अन्सार आणि अस्लम यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर  12 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अन्सारची पत्नी शकिना हिने हे आरोप फेटाळून लावले आहेत. अन्सार हा वाद मिटवण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले. एफआयआरनुसार, मिरवणुकीत सहभागी लोकांशी अन्सारचा वाद झाल्यानंतरच गोंधळ झाला.

  • आझाद चौक ते जहांगीरपुरीच्या सी ब्लॉकपर्यंत म्हणजेच ज्या ठिकाणी दगडफेक झाली, तिथे पोलिसांचा फ्लॅग मार्च निघाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली फ्लॅग मार्च काढण्यात आला. पोलिसांनी नागरिकांना सध्या घरातच राहण्यास सांगितलं आहे. यादरम्यान विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांनाही घराच्या आत पाठवण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिसरात वातावरण शांत आहे.

  • विशेष सीपी दीपेंद्र पाठक यांनी सांगितलं की, परिसरात पोलीस तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे. अफवांना आळा घालण्यात येत असून सोशल मीडियावरही सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. दिल्लीतील सर्व भागांवर पोलिसांची करडी नजर आहे. तपास पथकाकडून गुन्हेगारांचा शोध सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडीओंच्या मदतीने गुन्हेगारांची ओळख पटवली जात आहे.

  • आतापर्यंत 21 आरोपींना अटक करण्यात आलं आहे. अन्सार, अस्लम, जाहिद, शहजाद, मुख्त्यार अली हसन, मोहम्मद अली, अमीर, अक्सर, नूर आलम, जाकीर, अक्रम, इम्तियाज, अहिर, मोहम्मद अली, शेख सौरभ, सूरज, नीरज, सुकेन, सुरेश, सुजित सरकार आणि सलीम चिकना अशी अटक करण्यात आलेल्या 21 आरोपींची नावे आहेत. 

  • यामध्ये अस्लमवर गोळीबार आणि अन्सारवर शोभा यात्रेत सहभागी लोकांशी वाद घालण्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या 21 जणांव्यतिरिक्त 2 जण अल्पवयीन आहेत. तसेच पोलिसांनी आरोपींकडून तीन पिस्तूल आणि पाच तलवारी जप्त केल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha