Sri Lanka Crisis : देशाच्या स्वातंत्र्यानंतर सगळ्यात वाईट काळ पाहणाऱ्या श्रीलंकन जनतेचे हाल संपण्याची चिन्हं नाहीत.  श्रीलंकेत इंधन दरात मोठी दरवाढ करण्यात आली आहे. भारतीय तेल कंपनी इंडियन ऑइलची श्रीलंकेतील सहकारी कंपनी असलेल्या लंका आयओसीने (Lanka IOC) पेट्रोल-डिझेलच्या दरात 35 टक्क्यांनी वाढ केली आहे. या दरवाढीनंतर आता श्रीलंकेत डिझेलची किंमत प्रति लिटर 327 श्रीलंकन रुपये झाली आहे. तर, पेट्रोलची किंमत 367 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. एका भारतीय रुपयाची किंमत ही श्रीलंकेतील 4.26 रुपये इतकी आहे. 


श्रीलंकेच्या बाजारपेठेत लंका आयओसीचा एक तृतीयांश वाटा आहे. तर, दोन तृतीयांश वाटा हा सीलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा आहे. मात्र, त्यांच्या पेट्रोल पंपावर इंधन नाहीच. कंपनीने मागील आठवड्यात पेट्रोल-डिझेल खरेदी करण्याची मुदत निश्चित केली होती. लंका आयओसीनेदेखील तीन आठवड्यांआधी पेट्रोल-डिझेलच्या दरात 20 टक्क्यांची दरवाढ केली होती. स्थानिक चलनाची किंमत मोठ्या प्रमाणावर घसरल्याने दरवाढीचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे कंपनीने म्हटले. 


डिझेलच्या किंमतीत 138 टक्क्यांची दरवाढ, तरी भारतापेक्षा कमी दर!


या वर्षी श्रीलंकेत पेट्रोलच्या किंमतीत 90 टक्क्यांहून अधिक दरवाढ झाली आहे. तर, डिझेलची किंमत 138 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, श्रीलंकेतील इंधन दर हे भारताच्या तुलनेत कमी आहेत. श्रीलंकेत भारतीय रुपयांनुसार पेट्रोलची किंमत ही 86 रुपये आहे. तर, डिझेलची किंमत 76 रुपयांच्या जवळपास आहे. तर, दुसरीकडे राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर इतका दर आहे. 


श्रीलंकेची परकीय गंगाजळी संपूर्णपणे संपली आहे.त्यामुळे देशात खाद्यपदार्थ, पेट्रोल-डिझेल आणि औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून तीन ते चार अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज मागितले आहे. कोलंबो शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पाच दिवस शेअर बाजारातील व्यवहार बंद ठेवण्यात  आले आहेत.  


पाहा: श्रीलंकेत महागाईचा आगडोंब, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा