Ukraine-Russia War : गेल्या पाच दिवसापासून रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) युद्ध सुरू आहे. त्यामुळे तिथे भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. अशात अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. युद्ध क्षेत्रात अडकलेल्या भारतीयांना लवकरच परत आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) याबाबत उच्चस्तरीय बैठक घेतल्याचे समजते, दरम्यान काही केंद्रीय मंत्री युक्रेनलाही जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे. 


युक्रेनमधून 249 भारतीयांना घेऊन जाणारे विमान दिल्लीत दाखल


युक्रेन संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी काही केंद्रीय मंत्री शेजारील देशांमध्ये जाऊ शकतात. दरम्यान, युक्रेनमधून 249 भारतीयांना घेऊन जाणारे पाचवे विमान दिल्लीत दाखल झाले आहे. हे विमान रविवारी रात्री रोमानियाहून दिल्लीला गेले होते. परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. जेव्हा विमान दिल्ली विमानतळावर पोहोचले तेव्हा प्रियजनांना भेटून कुटुंबीय भावूक झाले. त्यावळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


दोन्हीपैकी एकही देश झुकायला तयार नाही


युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. पण दोन्हीपैकी एकही देश झुकायला तयार नाही. रशियाच्या लष्कराचा 5 किमी लांबीचा ताफा युक्रेनची राजधानी कीवच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. रशियन सैन्य कीववर ताबा मिळवण्याच्या तयारीत आहे. जगातील सर्वात मोठे विमान कीवजवळील एअरफील्डवर रशियन सैनिकांनी नष्ट केले. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली. वास्तविक AN-225 'Mriya' ज्याला युक्रेनमध्ये 'ड्रीम' म्हटले जाते ते युक्रेनच्या एरोनॉटिक्स कंपनी अँटोनोव्हने बनवले होते आणि ते जगातील सर्वात मोठे मालवाहू विमान म्हणून गणले जाते. रशियन गोळीबारामुळे कीवच्या बाहेर हॉस्टोमेल विमानतळावर विमान जळून खाक झाले.


4,300 रशियन सैनिकांचा मृत्यू


रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 116 मुलांसह 1684 लोक जखमी झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. मात्र, आतापर्यंत किती जवान शहीद झाले आहेत, हे मंत्रालयाकडून सांगण्यात आलेले नाही. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनने दावा केला आहे की, या लढाईत आतापर्यंत सुमारे 4,300 रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 146 रणगाडे, 27 विमाने आणि 26 हेलिकॉप्टर नष्ट करण्यात आले आहेत.


26 फेब्रुवारी: 219 भारतीय नागरिक दाखल
27 फेब्रुवारी: 250 
27 फेब्रुवारी: 240 
27 फेब्रुवारी: 198 
28 फेब्रुवारी: 249 



 


दोन्ही देशांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न


युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये मागील पाच दिवसांपासून युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने Operation Ganga सुरु केले आहे. त्याअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणले जात आहे. त्याशिवाय युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी OpGanga helpline नावाचे ट्विटर अकाऊंट उघडण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसंबंधित सर्व प्रश्न या ट्विटर अकाऊंटवर टाकल्यास उत्तर देण्यात येणार आहेत. दरम्यान, भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, भारताने आत्तापर्यंत युक्रेनमधून सुमारे 2,000 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. त्यापैकी 1,000 हंगेरी आणि रोमानिया मार्गे चार्टर्ड विमानांनी घरी परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.  


महत्त्वाच्या बातम्या: