Russia Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir putin) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पोलंड दौऱ्यावेळी बायडेन म्हणाले की, व्लादिमीर पुतिन सत्तेत राहू शकत नाहीत. बायडेन यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जाऊ लागले. त्यानंतर लगेचच, व्हाईट हाऊसने या विधानाबाबत स्पष्टीकरण जारी केले. व्हाईट हाऊसने सांगितले की, 'बायडेन यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा आहे. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे.' युक्रेनवरील हल्ल्यानंतर अनेक नेते पुतीन यांच्यावर सातत्याने आक्रमक वक्तव्ये करत आहेत.


बायडेन यांचे पुतीन यांच्यावर अनेक आरोप
अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी त्यांच्या चार दिवसांच्या युरोप दौऱ्यावर पोलंडच्या राजधानीत एका भाषणादरम्यान म्हटले की, 'पुतिन सत्तेवर राहू शकत नाहीत. हे युद्ध पुतीन यांच्यासाठी धोरणात्मक अपयशी ठरले आहे.' बायडेन यांनी पुतीन यांना पुन्हा एकदा युद्धाचा गुन्हेगार म्हटले. 


अमेरिका युद्धांत सामील होणार?
पुतिन सत्तेत राहू नये, या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावंतर अनेकांनी असे तर्ख लावले की, अमेरिकाही आता या युद्धात सामील होऊ शकते किंवा रशियामध्ये सत्ता बदलण्यासाठी प्रयत्न करू शकते. यानंतर व्हाईट हाऊसला बायडेन यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले.


व्हाईट हाऊसने दिले 'हे' स्पष्टीकरण
व्हाईट हाऊसने बायडेन यांच्या विधानावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 'बायडेन पुतीन यांच्या रशियातील सत्ता बदलाबाबत चर्चा करत नव्हते, तर बायडेन हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की, पुतीन त्यांच्या शेजारी किंवा प्रदेशावर राज्य करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.' 


'पुतिन यांना जनतेने निवडले'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या या वक्तव्यानंतर रशियाने प्रतिक्रिया दिली आहे. बायडेन यांच्या वक्तव्यावर क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, 'पुतिन राष्ट्राध्यक्षपदासाठी योग्य आहेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार बायडेन यांना नाही. रशियाचा राष्ट्राध्यक्ष रशियन लोक निवडतात.'


महत्त्वाच्या इतर बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha