Russia Ukraine Crisis: संपूर्ण जगाचं लक्ष रशिया-युक्रेन वादाकडे (Russia Ukraine Crisis) लागून आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या आदेशानंतर रशियन आर्मीने युक्रेनवर हल्ला केला असून मागील सहा दिवसांपासून प्रचंड विध्वंस होत आहे. युक्रेनमध्ये आणीबाणीची परिस्थिती असून सैनिकांसह सामान्य नागरिक मारले जात आहेत. अशामध्ये निधड्या छातीनं या सर्व परिस्थितीचा सामना युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की (Ukraine President Zelensky) करत आहेत. झेलेन्स्की स्वत: युद्धभूमीवर उतरले असून नुकतेच एका व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे ते युरोपियन संसेदेच्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या अवघ्य़ा काही मिनिटांच्या भाषणाने सर्वच संसदेतील मंडळी अगदी भारावून गेले आणि काही मिनिटं त्यांच्यासाठी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट सुरु होता. 


रशिय़ाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये विध्वंस होत असून अनेक शहरं बेछिराख होत आहेत. अशामध्ये नागरिकांचा आत्मविश्वास वाढवून आपण लढा कायम ठेवणार हे सांगताना झेलेन्स्की म्हणाले, 'आमचा लढा आमच्या जमिनीसाठी, स्वातंत्र्यासाठी आहे. आमची सर्व शहरं घेरली असली तरी आम्हाला कोणीच तोडू शकत नाही. आम्ही ताकदवर आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत'. दरम्यान व्होदिमर झेलेन्स्कीच्या या सिंहगर्जनेनंतर अवघ्या युरोपियन संसदेनं उभं राहून त्यांचं कौतुक केलं.  


'रशिया हा दहशतवादी देश'


पुढे बोलताना झेलेन्स्की म्हणाले, ''रशिया हा दहशतवादी देश आहे. रशियाचा हल्ला म्हणजे हा दहशतवादच आहे. रशियाच्या हल्ल्यात काल युक्रेनमधील 16 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. आमचे नागरिक या हल्ल्याची किंमत चुकवत आहेत. पण आमचा लढा स्वातंत्र्यासाठी असून आम्हाला इतर देशांचा पाठिंबा मिळत आहे. पण रशियाची ही वागणूक ना कोणी माफ करणार, ना कोणीही विसरेल.'' 



झेलेन्स्कीचा प्रवास


युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी 2019 साली निवडणूक जिंकली आणि युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. एक कॉमेडियन अभिनेता ते राष्ट्राध्यक्ष असा त्यांचा प्रवास खूपच रंजक आहे. व्होदिमर झेलेन्स्की यांचा जन्म 25 जानेवारी 1978 रोजी एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांच्या आजोबांनी दुसऱ्या महायुद्धात रेड आर्मिमध्ये काम केलं होतं. झेलेन्स्की यांचे वडील प्राध्यापक होते. स्वत: झेलेन्स्की यांनी कायद्याची पदवी घेतली पण त्यांचा ओढा हा अभिनयाकडे होता. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.  'सर्व्हंट ऑफ द पीपल' या टीव्ही शोमध्ये व्होदिमर झेलेन्स्की यांनी अभिनय केला. हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. या कार्यक्रमात त्यांनी एका शिक्षकाची भूमिका केली होती. हा शिक्षक भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतो आणि नंतर तो राजकारणात येऊन थेट राष्ट्राध्यक्ष बनतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून झेलेन्स्की घराघरात पोहोचले. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत लाखोंची वाढ झाली.


या कार्यक्रमामध्ये व्होदिमर झेलेन्स्की यांनी शिक्षक ते राष्ट्राध्यक्ष असा प्रवास करणाऱ्या व्यक्तीची भूमिका केली. नंतर हीच गोष्ट त्यांच्या खऱ्या आयुष्यातही सत्यात उतरली आणि अभिनय ते राष्ट्राध्यक्ष असा प्रवास त्यांनी पार पाडला. अभिनयाकडे ओढा असलेले व्होदिमर झेलेन्स्की यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी राजकारणात भाग घेतला.


सन 2019 सालची निडवणूक त्यांनी लढवण्याचा निर्णय घेतला. त्या निवडणुकीत व्होदिमर झेलेन्स्की यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचवले. त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी तीन चतुर्थांश मतं घेतली आणि ते युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष झाले. आपण निवडणूक जिंकल्यावर रशियाशी चांगले संबंध प्रस्थापित करु असं आश्वासन व्होदिमर झेलेन्स्की यांनी दिलं होतं. व्होदिमर झेलेन्स्की निवडून आल्यानंतर रशियाच्या ब्लादिमिर पुतिन यांनी त्यांचे अभिनंदन केलं आणि लगेच पूर्व युक्रेनच्या लोकांना रशियात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट देण्याचा निर्णय घेतला. आता सध्या झेलेन्स्की रशियाविरुद्धच्या युद्धामध्ये युद्धभूमीवर निधड्या छातीने लढत आहेत.


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha