Covid 19 Virus : कोरोना विषाणू ( Sars CoV 2 ) हा हवेतून पसरतो, हे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं आहे. कोरोना विषाणू ( Covid 19) हा प्रामुख्याने वॉटर ड्रॉपलेट्सद्वारे पसरतो, असं मानलं जात होतं. एखादी जवळची व्यक्ती तुमच्यासोबत संपर्कादरम्यान खोकल्यामुळे, शिंकण्यामुळे किंवा बोलताना नकळत बाहेर पडणाऱ्या थुंकीद्वारे कोरोना विषाणू पसरतो, असं आतापर्यंत मानलं जातं होतं. पण आता एका संशोधनातून समोर आलेल्या अहवालानुसार, कोरोना विषाणू हवेतून पसरतो, यावर जागतिक आरोग्य संघटनेनंही शिक्कामोर्तब केला आहे.


हवेतून पसरतो कोरोना विषाणू


जगभरात 2020 साली कोरोनाचा कहर पाहायला मिळत होता. कोरोना विषाणू संसर्ग अधिकच वाढला होता. कोरोना विषाणू खोकताना किंवा शिंकताना थुंकूतून पसरतो, असं यावेळी समोर आलं होतं. यानंतर वैज्ञानिकांच्या एका चमूने कोरोना विषाणूबाबतची माहिती पुन्हा तपासण्यास सुरुवात केली. यामध्ये शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की, कोरोना विषाणू फक्त खोकताना किंवा शिंकताना वॉटर ड्रॉपलोट्समधून नाही, तर हवेतूनही पसरतो.


लिन्सी आणि त्यांच्या टीमचं संशोधन 


लिन्सी मार ( Linsey Marr ) एक एरोसोल शास्त्रज्ञ ( Aerosol Scientist ) म्हणजे हवेतील लहान कणांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञ आहेत. लिन्सी आणि त्यांच्या टीमने कोरोना विषाणूबाबतच्या संशोधनाचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेसमोर मांडला. या संशोधनात कोरोना विषाणू वॉटर ड्रॉपलेट्समधून पसरत असल्याचा म्हणजेच वॉटर ड्रॉपलेट-एरोसोल डिकोटॉमीचा पुनर्विचार केला आणि या संशोधनातून नवीन माहिती स्पष्ट झाली आहे. लिन्सी मार आणि त्याच्या टीमच्या संशोधनामुळे WHO ला ही कोरोना विषाणू संदर्भातील नवीन बाबी मान्य करावं लागलं आहे.


शास्त्रज्ञांसमोर मांडले महत्त्वाचे मुद्दे


लिन्सी मार यांनी WHO शास्त्रज्ञांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगमध्ये जागतिक आरोग्य संघटनेसमोर संशोधनातील विविध मुद्दे मांडले. व्हर्जिनिया टेकमधील एरोसोल शास्त्रज्ञ लिन्सी मार यांनी  35 शास्त्रज्ञांच्या टीमचं नेतृत्व केलं. शास्त्रज्ञांच्या या गटाने जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकार्‍यांना त्यांची भूमिका बदलण्यासाठी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, कोविड-19 हवेतूनही पसरतो. कोरोना विषाणू हवेतून नाही तर फक्त वॉर ड्रॉपलेट्समधून पसरतो, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांच्या मत होतं. यावर स्पष्टीकरण देत लिन्सी मार यांनी WHO ला सांगितलं की, कोरोना जर विषाणू फक्त थुंकी किंवा खोकल्यातून निघणाऱ्या थेंबांद्वारे प्रवास करत असेल, तर सामाजिक अंतर आणि हात धुण्याने कोरोना उद्रेक का रोखता आला नाही? 


विषाणूच्या उद्रेकाचं मूळ कारण विषाणूच्या आकारात आहे. WHO च्या मते, 5 मायक्रॉन आकाराचा विषाणूचं फक्त हवेतून प्रवास करू शकतो. एका व्यक्तीच्या तोंडातून बाहेर पडलेल्या पाच मायक्रॉन सहा फुटांपेक्षा जास्त प्रवास करु शकतो.  लिन्सी मार यांच्या टीमला संशोधनात असं आढळून आलं की, 100 मायक्रॉन आकारापर्यंतचा विषाणू हवेतून प्रवास करू शकतो. हार्वर्डच्या शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की, बहुतेक आजारांचे विषाणू हवेतून पसरतात. यावेळी WHO हे मान्य करण्यास नकार दिला होता.


लिन्सी यांनी संशोधनाचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेसमोर माडल्यानंतर आता वर्षभरानंतर WHO ने मान्य केलं की, कोविड 19 विषाणू हवेतून पसरतो. लिन्सी यांची WHO सोबतची झूम बैठक एप्रिल 2021 मध्ये पार पडली होती. त्यानंतर आता WHO ने लिन्सी यांच्या टीमचं संशोधन मान्य करत त्यांच्या वेबसाइटवर अधिकृत माहिती समाविष्ट केली आहे. ज्यामध्ये लिहीलं आहे की, कोरोना व्हायरस एरोसोल म्हणजे हवेतून तसेच मोठ्या थेंबाद्वारे पसरू शकतो.