South Korea Exam : परीक्षेदरम्यान (Exam) काही विद्यार्थी वेळ पूर्ण होण्यापूर्वीच पेपर जमा करतात, तर काहींचा पेपर वेळेत पूर्ण होत नाही. दक्षिण कोरियामध्ये (South Korea) परीक्षेसंदर्भात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. परीक्षेचा पेपर वेळेआधी जमा करुन घेतला म्हणून थेट सरकारवर नुकसानभरपाईचा दावा ठोकला आहे. महाविद्यालयीन प्रवेश परीक्षा (College Entrance Exam) नियोजित वेळेच्या 90 सेकंद आधी संपल्यामुळे विद्यार्थ्यांनी (Students) कोर्टात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांनी सरकारवर दावा ठोकत मोठ्या दंडाची नुकसानभरपाई म्हणून मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी सरकारकडून 20 दशलक्ष दक्षिण कोरियन वॉन म्हणजे अंदाजे 15,400 डॉलर भारतीय चलनातमध्ये ही रक्कम 12,81,537 रुपये आहे.


परीक्षा 90 सेकंदांपूर्वी संपल्याने थेट सरकारवरच खटला


दक्षिण कोरियामध्ये कॉलेज प्रवेशासाठीची परीक्षा 90 सेकंद आधी संपवल्याने विद्यार्थांनी सरकारविरोधात न्यायालयात नाव घेतली आहे. दक्षिण कोरियामध्ये कॉलेज प्रवेशासाठी सुनेंग नावाची परीक्षा असते. ही खूप कठीण परीक्षा असते. मात्र, विद्यार्थ्यांचा पेपर परीक्षेची वेळ संपण्याच्या 90 सेकंदांपूर्वी घेण्यात आला होता, असं म्हणत विद्यार्थ्यांनी सरकारवर दावा ठोकला आहे. विद्यार्थांचा पेपर वेळ पूर्ण होण्याच्या 90 सेकंदांपूर्वी घेण्यात आला होता, ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांनी दक्षिण कोरिया सरकारवरच खटला दाखल केला आहे. विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे की, त्यांची परीक्षा 90 सेकंद आधी संपली होती. यामुळे त्यांनी सरकारकडे 15 हजार डॉलर्स नुकसानभरपाई मागितली आहे.


या त्रुटीमुळे उर्वरित विषयांच्या परीक्षांवर परिणाम


नुकसानभरपाईची रक्कम प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. ही रक्कम प्रत्येक विद्यार्थ्याच्या एका वर्षाची तयारी आणि परीक्षेसाठीचा खर्च आहे. परीक्षेतील या त्रुटीमुळे उर्वरित विषयांच्या परीक्षांवर परिणाम झाल्याचा दावा विद्यार्थ्यांच्या वकिलांने न्यायालयात केला आहे. दक्षिण कोरियामध्ये सुनेंग नावाची परीक्षा घेण्यात येते आहे. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ही अत्यंत अवघड परीक्षा देणे बंधनकारक असते. ही परीक्षा आठ तासांची मॅरेथॉन असते, ज्यामध्ये एकामागून एक असे अनेक विषयांचे पेपर असतात.


जगातील सर्वात कठीण परीक्षा


सुनेंग ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दक्षिण कोरियातील विद्यार्थ्यांचं भविष्य या परीक्षेवर अवलंबून असते. विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी तसेच नोकरी आणि चांगली प्लेसमेंट मिळण्यासाठी ही परीक्षा आवश्यक ठरते. वार्षिक परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून सरकारकडून अनेक उपाय केले जातात. या परीक्षेसाठी देशाची हवाई सेवा बंद करणे आणि शेअर बाजार उशिरा उघडणे, अशी सोयही केली जाते. यंदाच्या सुनेंग परीक्षेचा निकाल 8 डिसेंबरला लागला आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


दक्षिण कोरियातील 39 विद्यार्थ्यांच्या वतीने मंगळवारी सरकारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, कोरियन विषयादरम्यान राजधानी सोल (Seoul) मधील परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच घंटा वाजली. काही विद्यार्थ्यांनी याचा ताबडतोब विरोध केला. पण, तरीही पर्यवेक्षकाने त्यांचा पेपर वेळेआधी जमा करुन घेतला, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पुढचे सत्र सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या ही चूक लक्षात आली आणि जेवणाच्या सुट्टीत त्यांना दीड मिनिटाची विश्रांती देण्यात आली. पण या वेळेत विद्यार्थी त्याच्या पेपरवर राहिलेले रिकाम्या जागा भरू शकत होते, त्याआधी लिहिलेली कोणतीही उत्तरे बदलण्याची विद्यार्थ्यांना परवानगी नव्हती. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, तो खूप अस्वस्थ होता, त्यामुळे पुढील परीक्षेवर लक्ष केंद्रित करता आलं नाही.