Pakistan Flood : पाकिस्तान मोठं नैसर्गिक संकट कोसळलं आहे. पाकिस्तानमध्ये सध्या भीषण पूरस्थिती असून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांना अन्न आणि पाणी यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे. पुरामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो जनावरांचाही बळी गेला आहे. महापुरामुळे पाकिस्तानमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अन्न-पाण्याविना बालकांचे हाल झाले आहेत.
पूरस्थितीमुळे लहान मुलांचे अधिक हाल होताना पाहायला मिळत आहेत. सततच्या पावसामुळे मुलं अधिक प्रमाणात आजारी पडत आहेत. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील महापुरामुळे सुमारे एक कोटी 60 लाख बालकांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये सुमारे 40 लाख बालकांना वैद्यकिय सेवेची आवश्यकता आहे.
युनिसेफने दिली 'ही' माहिती
यूएन इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स इमर्जन्सी फंडचे (युनिसेफ) प्रतिनिधी अब्दुल्ला फदील यांनी शुक्रवारी पूरग्रस्त भागाला भेट दिली. दोन दिवसांच्या भेटीनंतर दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. लहान मुलांना अतिसार, डेंग्यू आजारांची लागण होण्याचं प्रमाण अधिक आहे. अनेक बालके कुपोषित आहेत. ताप, त्वचा रोगांनी आणि इतर रोगांची लागण झाल्याने आतापर्यंत सुमारे 528 मुलांचा मृत्यू झाला आहे. यापैकी प्रत्येक मृत्यू ही एक शोकांतिका आहे. हे मृत्यू जी टाळता आले असते.
आरोग्य सुविधांची कमतरता
अल्पवयीन मुलांना पिण्याचे पाणी, अन्न आणि उदरनिर्वाहाशिवाय कुटुंबासह उघड्यावर राहावं लागत आहे. मुलांच्या शाळा, आरोग्य सुविधा आणि इतर गोष्टी पुरामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांना या दु:खाच्या काळात मदतीची गरज आहे. जी लहान मुलं महापुरातून वाचली आहेत त्यांना आता आणखी एक धोका आहे. प्रत्यक्षात अनेक कुटुंबांना उघड्यावर, रस्त्याच्या कडेला आश्रय घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय उघड्यावर साप, विंचू यांचीही भीती कायम आहे. युनिसेफ बाधित मुले आणि कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि त्यांना जलजन्य रोग, कुपोषण आणि इतर जोखमींच्या सध्याच्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे, अशी माहिती युनिसेफच्या प्रतिनिधींनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या