नवी दिल्ली : अजब आणि टोकाचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उत्तर कोरियामध्ये कोरोना व्हायरस पसरू नये यासाठी त्यांनी एक वादग्रस्त निर्णय घेतला असून जगभरात या निर्णयाची सध्या चर्चा सुरु आहे. 'इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स'च्या रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस उत्तर कोरियामध्ये पसरु नये यासाठी कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपाचार करण्याआधी त्याला थेट गोळ्या झाडण्याचे आदेश किम जोंग यांनी दिले आहेत.


रिपोर्टनुसार, उत्तर कोरियातील एक व्यावसायिक कामानिमित्त चीनमध्ये गेला होता. तेथे त्याला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचं निष्पन्न झालं होतं. चीनमधून परतल्यानंतर या व्यक्तीकडून इतर नागरिकांना धोका निर्माण होऊ नये, म्हणून त्या व्यावसायिकाला गोळ्या घालण्याचे आदेश किम जोंग यांनी दिले. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी इतर यंत्रणा सज्ज असल्याचंही उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.


जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत तीन हजारहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर 86 हजार लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेल्या माहितीनुसार हुबेई प्रांतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. वुहान प्रांतात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) या रोगाला COVID-19 असं नाव दिलं आहे.


कोरोना व्हायरस म्हणजे काय?


कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.


लक्षणे कोणती आहेत ?


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.


काय काळजी घ्याल?


तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.


संबंधित बातम्या

Coronavirus | 'कोरोना व्हायरस' होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? | ABP Majha