मुंबई : क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार (Nobel Prize) जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने क्लॉडिया गोल्डिन यांना अल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ 2023 चा अर्थशास्त्रातील Sveriges Riksbank पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या नोबेल पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. अनेक दिग्गज लोकं या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
कोण आहेत क्लॉडिया गोल्डिन?
क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. 1989 ते 2017 या काळात त्या NBER च्या डेव्हलपमेंट ऑफ यूएस इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक होत्या. गोल्डिन यांनी केलेल्या संशोधनामध्ये महिलांची श्रम शक्ती, कमाईतील लिंग अंतर, उत्पन्न असमानता, तांत्रिक बदल, शिक्षण आणि इमिग्रेशन यांसह विविध विषयांचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यांनी केलेले बरचसे संशोधन हे भूतकाळाच्या दृष्टीकोनातून वर्तनमानाचा अर्थ लावते. त्यांनी रिअर अँड फॅमिली, अ सेंच्युरी ऑफ वुमन - द लाँग जर्नी टूवर्ड इक्विटी ही पुस्तके लिहिली आहेत.
यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी 351 उमेदवार
सोमवारी वैद्यकीय क्षेत्रातील विजेत्याची घोषणा करून नोबेल पुरस्काराचे उद्घाटन करण्यात आले. तर आज नोबेल शांतता पुरस्कार 2023 च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी 351 उमेदवार होते, त्यापैकी 259 व्यक्ती आणि 92 संस्था आहेत. सलग आठ वर्षांपासून उमेदवारांची संख्या 300 च्या वर गेली आहे. यावर्षी नोबेल पुरस्काराच्या मानांकनाच्या यादीत वकील कोहसार, नर्गेस मोहम्मदी फाऊंडेशन, अफगाण महिला कार्यकर्त्या मेहबूबा सेराज, इराणी हक्क प्रचारक नर्गेस मोहम्मद, यांची नावे समाविष्ट होती. 1901 मध्ये फ्रेडरिक पासी आणि हेन्री ड्युनांट यांना पहिल्यांदा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
का दिला जातो नोबेल पुरस्कार ?
वर्षभरात मानवतेसाठी मोलाचं कार्य करणाऱ्यांना नोबेल पुरस्कारांनी गौरविण्यात येतं. हा पुरस्कार अनेक क्षेत्रांमध्ये दिला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाइटचे शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.