Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) शनिवारी (7 ऑक्टोबर) आलेल्या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 2000 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. दर तासाला मृतांचा आकडा वाढत आहे. या आपत्तीत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. तर काही लोकांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.
सोशल मीडियावर अफगाणिस्तानातील भूकंपानंतरचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, जे पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यात एका व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब भूकंपामुळे ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. त्याच्या कुटुंबातील सर्व 14 लोकांचा मृत्यू झाला आणि तो एकटा या स्थितीतून बचावला, याची खंत व्यक्त करताना त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. हा व्हिडीओ पाहून आणि त्याची स्थिती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
भूकंपात अख्खं घर जमीनदोस्त
खरं तर, या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ढसढसा रडताना दिसत आहे. भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या आपल्या घराच्या ढिगाऱ्यावर तो उभा आहे आणि याच ढिगाऱ्याखाली त्याचं संपूर्ण कुटुंब गाडलं गेल्याचा आक्रोश तो व्यक्त करत आहे. अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात ही व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत होती. मात्र, भूकंपामुळे त्याचं संपूर्ण घर मातीत जमा झालं. हा व्यक्ती तेथील ढिगाऱ्यावर उभा राहून मोठमोठ्याने आपल्या कुटुंबीयांना हाक मारत आहे, ओरडत आहे आणि रडत टाहो फोडत आहे.
कुटुंबातील 14 लोक ढिगाऱ्याखाली
असं सांगितलं जात आहे की, हा माणूस त्याच्या 14 लोकांच्या कुटुंबासह राहत होता. भूकंपामुळे त्याचं संपूर्ण घर कोसळलं आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले. कुटुंबातील 14 सदस्यांपैकी एकाही सदस्याचा शोध लागलेला नाही. ढिगाऱ्याखील गाडल्या गेलेल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये 5 दिवसांच्या नवजात बालकाचाही समावेश आहे. भूकंपाच्या आपत्तीत या व्यक्तीने आपलं संपूर्ण कुटुंब गमावलं आहे. ही असहाय्यता पाहून हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाचं मन पाकूळतं.
10 हजारांहून अधिक लोक जखमी
शनिवारी (7 ऑक्टोबर) अफगाणिस्तानमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप आला. या भूकंपात 2,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं सांगण्यात येत आहे. तर 10,000 हून अधिक लोक जखमी झाल्याचं बोललं जात आहे. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले असून जीवन-मरणाची लढाई लढत आहेत. या शक्तिशाली भूकंपामुळे 1,320 घरं जमीनदोस्त झाल्याचंही बोललं जात आहे.
हेही वाचा: