बीजिंग: अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांनी जर तैवानमध्ये पाय ठेवल्यास चीनचे लष्कर शांत बसणार नाही अशी थेट धमकीच चीनने अमेरिकेला दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी या सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर चीनने लगेच ही धमकी दिली आहे. नॅन्सी पेलोसी या तैवानला भेट देणार असल्याची बातमी समोर येत असताना चीनने ही प्रतिक्रिया दिली.


नॅन्सी पेलोसी या अमेरिकेच्या लष्करी विमान C-40C मधून सिंगापूरला पोहोचल्या असून त्यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली हसियन लूंग यांची भेट घेतली. नॅन्सी पेलोसी या मलेशिया, जपान आणि साऊथ कोरियाला भेट देणार आहेत. त्याचसोबत त्या तैवानला भेट देणार असल्याची शक्यता असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यावर आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप घेतला असून नॅन्सी पेलोसी यांनी तसं केल्यास चीनचे लष्कर शांत बसणार नाही अशी थेट धमकीच दिली आहे. 


'वन चायना पॉलिसी'चा अमेरिकेने आदर करावा
नॅन्सी पेलोसी यांच्या पूर्व आशियाच्या दौऱ्यावरून चीनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, चीन आपली अखंडता आणि संरक्षणासाठी तयार आहे. अमेरिकेने तैवानच्या स्वातंत्र्यावर बोलणं बंद करावं. तैवान हा चीनचा एक भाग असून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या वचनाचे पालन करावं. चीनच्या 'वन चायना पॉलिसी'चा अमेरिकेने आदर करावा. अमेरिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या नेत्या असलेल्या नॅन्सी पेलोसींनी जर तैवानचा दौरा केला तर त्याचे गंभीर राजकीय परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील.


चीनच्या या निवेदनावर अद्याप अमेरिकेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. 


महत्त्वाच्या बातम्या