Elon Musk Twitter Deal : टेस्ला (Tesla) आणि ट्विटर (Twitter) यांचं विलिनीकरण होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतं आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या नवीन ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. टेस्लाचे मालक एलॉन मस्क सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. मस्क कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील वेगवेगळ्या पोस्ट कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्हायरल होतात. त्यातच ट्विटर आणि एलॉन मस्क यांचं नातं काही नवीन नाही.
टेस्ला आणि ट्विटरचं विलिनीकरण?
एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार रद्द (Twitter Deal) केल्याचं प्रकरण बरेच चर्चेत राहीलं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतची 44 अब्ज कोटींची डील रद्द केली आहे. पण या दरम्यान एलॉन मस्क यांनी 30 जुलै रोजी केलेल्या एका ट्विटने सर्वांना संभ्रमात टाकलं आहे. मस्क यांचं ट्विट पाहून टेस्ला आणि ट्विटर यांचं विलिनीकरण होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एलॉन मस्क यांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय?
एलॉन मस्क यांनी एक ट्विट करत लिहिलं आहे की, 'टेस्ला + ट्विटर -> ट्विझलर.' आता एलॉन मस्क यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. टेस्ला आणि ट्विटर लवकरच विलीन होणार आहेत, असे अनेकांना वाटतं आहे. एलॉन मस्क यांचे ट्विट हेच संकेत देत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
17 ऑक्टोबरपासून ट्विटर VS मस्क वादावर सुनावणी
ट्विटरसोबतचा 44 अब्ज डॉलर्सचा करार रद्द केल्याबद्दल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कच्या विरोधात ट्विटरने कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. आता 17 ऑक्टोबरपासून दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू होणार आहे. या हायप्रोफाईलच्या खटल्यासाठी अमेरिकन न्यायाधीशांनी तारीख निश्चित केली आहे.