Pakistan News : पाकिस्तानमध्ये लवकरच सार्वत्रिक निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी तयारी सुरु केली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी फेडरल आणि प्रांतीय असेंब्लीमधील सदस्यांना निवडणुकांसाठी आणि कलांसाठी (Snap Polls)  तयार राहण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानमध्ये येत्या सहा ते आठ आठवड्यांत पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. इम्रान खान यांच्याकडूनही लवकरात लवकर निवडणुका घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 


इम्रान खान यांचं प्रांतीय विधानसभेमध्ये मजबूत स्थान आहे, चारपैकी दोन प्रांतीय विधानसभेवर त्यांची सत्ता आहे. गिलगिट बाल्टिस्तान (जीबी) आणि काश्मीर या दोन विधानसभांवर पीटीआय पक्षाचं नियंत्रण आहे. दुसरीकडे, सत्ताधारी सरकारकडे फक्त फेडरल सरकारचं नियंत्रण आहे, जर इम्रान खान यांनी प्रांतीय विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. तर शाहबाज शरीफ आणि फेडरल सरकारला नाईलाजाने सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाग घेण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असं झाल्यास शाहबाज शरीफ यांचं सरकार अडचणीत येऊन कोसळू शकते.


इम्रान खान यांनी पंजाब विधानसभेत पीटीआयच्या संसद सदस्यांशी झालेल्या बैठकीदरम्यान प्रांतातील पीटीआयची (PTI)  संघटनात्मक रचना पूर्ण करण्याचं काम ज्येष्ठ सदस्यांना दिलं आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयने मोठा विजय मिळवला आहे. आपला पराभव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.


इम्रान खान यांनी यावेळी सांगितलं आहे की, देशात लवकरात लवकर निवडणुका झाल्या तर देशावरील आर्थिक संकट दूर होण्यास मदत होईल. त्यांनी म्हटलं आहे की, 'ज्यांनी आम्हाला फसवले त्यांना मी ओळखतो, त्यांनी आमचं सरकार पाडलं. परंतु मी सर्वांसमोर कोणाचेही नाव घेऊ इच्छित नाही. ज्यांनी 25 मे रोजी गोपनीयतेचे उल्लंघन केले त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होईल, ही आशा आहे.' 


इम्रान खान यांनी म्हटलं आहे की, सध्याचं सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाही. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सत्ताबदलाचं षडयंत्र रचून हे सरकार स्थापन केल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. देशात स्थिरता केवळ निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकांमुळेच शक्य आहे. लोक पैशासाठी राजकारणात येतात पण आता जनता जागृत झाली आहे. पीटीआयकडून लोकांना अपेक्षा आहेत', असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.