मुंबई : मुंबईचे डबेवाले आणि ब्रिटनचं राजघराणं याचं नातं सगळ्यानांच परिचीत आहे. प्रिन्स चार्ल्स नुकतेच पुन्हा एकदा आजोबा बनले आहेत. त्यांचे द्वितीय पुत्र प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन मर्केल यांना मुलगा झाला आहे. याचा आनंद मुंबईच्या डबेवाल्यांनाही झाला आहे. त्यामुळेच प्रिन्स चार्ल्स यांच्या नातवासाठी डबेवाल्यांनी दागिन्यांची खरेदी केली आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांनी आज घाटकोपरच्या सेजल ज्वेलर्स या दुकानातून दागिने विकत घेतले. या दागिन्यांमध्ये चांदीचे वाळे, पैंजण, कंबरपट्टा, चैन तसंच सोन्याचं हनुमानाचं पेंडटही घेतलं आहे. महाराष्ट्राची परंपरा आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या तिसऱ्या पिढीशी ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनी ही खरेदी केली आहे.
प्रिन्स चार्ल्स यांच्या भेटीमुळे आम्हाला जगभरात ओळख मिळवून दिली. आम्हाला, आमच्या कामाला प्रसिद्धीच्या झोतात आणणारे प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले आणि राजघराण्याला राजपुत्र मिळाला. याचा आम्हाला आनंद झाला आहे. ज्याप्रमाणे आजोबा आपल्या नातवाला भेट देतात तसंच आमच्या या छोट्या नातवाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही ही भेट पाठवत असल्याचं डबेवाल्यांनी सांगितलं.
डबेवाले हे सर्व दागिने आज ब्रिटीश काऊन्सिलमध्ये जाऊन देणार आहे. त्यांच्यामार्फत दागिने ब्रिटन राजघराणाच्य नव्या राजपुत्राला मिळतील.
राजपुत्राचं नामकरण
प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांना 6 मे रोजी मुलगा झाला. स्थानिक वेळेनुसार 6 मे रोजी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. नुकतीच त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. मेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांनी आपल्या मुलाचं नाव 'आर्ची हॅरिसन माऊंटबॅटन-विंडसर' असं ठेवलं आहे. हॅरी हे ड्यूक ऑफ ससेक्स, तर मेगन मार्कल या हर रॉयल हायनेस द डचेस ऑफ ससेक्स म्हणून ओळखले जातात. ब्रिटनच्या राजघराण्यातील नवा पाहुणा क्वीन एलिझाबेथ यांचं आठवं पतवंड ठरलं आहे.
ब्रिटनच्या राजघराण्यात वारसदारांचा क्रम बदलला
प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्या बाळाच्या जन्मामुळे ब्रिटनच्या राजघराण्यात वारसदारांचा क्रम बदलला आहे. नवा पाहुणा ब्रिटनच्या राजगादीच्या वारसदारांच्या यादीत सातव्या क्रमांकावर असेल. क्वीन एलिझाबेथ यांचे द्वितीय पुत्र बाळाच्या आगमनामुळे आठव्या क्रमांकावर गेले आहेत.
क्वीन एलिझाबेथ यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स चार्ल्स (प्रिन्स ऑफ वेल्स) हे पहिले उत्तराधिकारी आहेत. क्वीन एलिझाबेथ यांचा सर्वात मोठा नातू अर्थात प्रिन्स चार्ल्स यांचे पुत्र प्रिन्स विल्यम्स (ड्यूक ऑफ केंब्रिज) हे राजगादीचे दुसरे वारसदार ठरतात.
तिसरा क्रमांक लागतो क्वीन एलिझाबेथ यांचा सर्वात मोठा पणतू, अर्थात प्रिन्स विल्यम्स यांचा मोठा मुलगा प्रिन्स जॉर्ज (ऑफ केंब्रिज) याचा. प्रिन्स जॉर्ज आता सहा वर्षांचा होईल. त्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर आहे त्याची धाकटी बहीण प्रिन्सेन शार्लेट (ऑफ केंब्रिज). ती चार वर्षांची आहे. तर पाचव्या क्रमांकाचा वारसदार आहे जेमतेम एक वर्षांचा प्रिन्स ल्युईस (ऑफ केंब्रिज).
प्रिन्स चार्ल्स 2003 मध्ये भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी डबेवाल्यांना त्यांच्या लग्नाचं निमंत्रण दिलं होते. प्रिन्स चार्ल्स यांनी डबेवाल्यांच्या मॅनेजमेंट कौशल्याचं कौतुक केलं होतं. त्यामुळे 2005 साली लंडनमध्ये झालेल्या लग्न सोहळ्यात दोन डबेवाल्यांनी हजेरी लावली होती. तेव्हापासून ब्रिटनच्या राजघराण्याशी त्यांचे भावनिक संबंध आहेत. यानंतर प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्या लग्नात डबेवाल्यांनी दोघांना सलवार-कुर्ता फेटा आणि पैठणी साडी, चोळी असा मराठमोळा आहेर म्हणून पाठवला होता.
ब्रिटन राजघराण्याच्या नव्या राजपुत्रासाठी मुंबईच्या डबेवाल्यांकडून दागिन्यांची खरेदी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 May 2019 02:14 PM (IST)
प्रिन्स चार्ल्स 2003 मध्ये भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी डबेवाल्यांना त्यांच्या लग्नाचं निमंत्रण दिलं होते. प्रिन्स चार्ल्स यांनी डबेवाल्यांच्या मॅनेजमेंट कौशल्याचं कौतुक केलं होतं. त्यामुळे 2005 साली लंडनमध्ये झालेल्या लग्न सोहळ्यात दोन डबेवाल्यांनी हजेरी लावली होती. तेव्हापासून ब्रिटनच्या राजघराण्याशी त्यांचे भावनिक संबंध आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -