लंडन : ब्रिटनच्या राजघरण्यात नुकत्याच जन्मलेल्या राजपुत्राच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांनी आपल्या मुलाचं नाव 'आर्ची हॅरिसन माऊंटबॅटन-विंडसर' असं ठेवलं आहे. इन्स्टाग्रामवरील अधिकृत अकाऊंटवरुन रॉयल बेबीच्या नावाची घोषणा करण्यात आली.


नव्या पाहुण्याचं नाव जाहीर करताना 'ससेक्स रॉयल' या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर लिहिलं आहे की, 'द ड्यूक अॅण्ड डचेस ऑफ ससेक्स' यांना सांगताना आनंद होत आहे की, त्यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं नाव ठेवलं आहे : "आर्ची हॅरिसन माऊंटबॅटन-विंडसर"


प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांना 6 मे रोजी मुलगा झाला. स्थानिक वेळेनुसार 6 मे रोजी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांनी बाळाचा जन्म झाला. हॅरी हे ड्यूक ऑफ ससेक्स, तर मेगन मार्कल या हर रॉयल हायनेस द डचेस ऑफ ससेक्स म्हणून ओळखले जातात. ब्रिटनच्या राजघराण्यातील नवा पाहुणा क्वीन एलिझाबेथ यांचं आठवं पतवंड ठरलं आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचं रॉयल वेडिंग लंडनमधील सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये गेल्या वर्षी (19 मे 2018 रोजी) झालं होतं. प्रिन्स हॅरी हे दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकटे पुत्र, तर क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत.

रॉयल बेबीच्या जन्माने ब्रिटनच्या राजघराण्यात वारसदारांचा क्रम बदलला

मेगन मार्कलने लग्नापूर्वी टीव्ही आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. सुट्स, फ्रिंज, सीएसआय : मायामी, नाईट रायडर अँड कॅसल सारख्या टीव्ही सीरिज, हॉरिबल बॉसेस सारख्या चित्रपटात ती झळकली आहे.

केंब्रिजचे ड्यूक आणि डचेस अर्थात प्रिन्स हॅरी यांचे ज्येष्ठ बंधू प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांना 5 वर्षांचा प्रिन्स जॉर्ज, 3 वर्षांची प्रिन्सेस शार्लेट आणि सव्वा वर्षांचा प्रिन्स ल्युईस ही तीन अपत्यं आहेत.