मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचं मतदान अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला प्रचारसभांमध्ये झोकून दिलं आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय मासिक 'टाइम'ने आपल्या नव्या अंकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान मोदींना जागा दिली आहे. मात्र मासिकाने मोदींना वादग्रस्त उपाधी दिली आहे. "India's Divider in Chief" म्हणजे 'भारतात दुफळी निर्माण करणारा नेता' असं 'टाइम'ने मोदींच्या फोटोसह लिहिलं आहे.
'टाइम' मासिकाच्या आशिया आवृत्तीत लोकसभा निवडणूक 2019 आणि मागील पाच वर्षांतील नरेंद्र मोदींच्या कामाकाजावर आधारित आतीश तासीर यांनी प्रमुख लेख लिहिला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला मोदी सरकारची आणखी पाच वर्ष सहन करावी लागणार? (Can the World's Largest Democracy Endure Another Five Years of a Modi Government?) असा या लेखाचा मथळा आहे. मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप या लेखात केला आहे.
नेहरु आणि मोदींमध्ये तुलना
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामकाजावर कठोर टिप्पणी करताना मासिकाने नेहरुंचा समाजवाद आणि भारतातील सध्याची सामाजिक परिस्थितीची तुलना केली आहे. आतीश तासीर यांनी लिहिलेल्या या लेखात म्हटलं आहे की, "नरेंद्र मोदींनी हिंदू आणि मुस्लीमांमधील बंधुभावाची भावना वाढवण्यासाठी कोणतीही इच्छा दाखवली नाही."
हिंदू-मुस्लीमांमध्ये बंधुभावाची भावना निर्माण करण्यात अपयशी
या लेखात म्हटलं आहे की, "नरेंद्र मोदींनी भारताच्या महान व्यक्तिमत्त्वांवर राजकीय हल्ला केला, जसे की नेहरु. ते काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करतात, त्यांनी कधीही हिंदू-मुस्लीमांमध्ये बंधुभावाची भावना अधिक दृढ करण्यासाठी कोणहीती इच्छाशक्ती दाखवली नाही. नरेंद्र मोदींचं सत्तेत येणं यावरुन हे दिसतं की, भारतात ज्या कथित उदारमतवादी संस्कृतीची चर्चा केली जाते, खरंतर तिथे धार्मिक राष्ट्रवाद, मुसलमानांविरोधातील भावना आणि जातीयवादी कट्टरत जपली जात होती."
शीख दंगल आणि गुजरात दंगलीचा उल्लेख
'टाइम'च्या या लेखात 1984 च्या शीख दंगल आणि 2002 च्या गुजरात दंगलीचाही उल्लेख केला आहे. "काँग्रेस नेतृत्त्वही 1984 च्या शीख दंगलीमुळे आरोपमुक्त नाही, पण तरीही त्यांनी दंगलीदरम्यान उच्छाड मांडणाऱ्या जमावाला स्वत:पासून वेगळं ठेवलं होतं. पण 2002 च्या दंगलीदरम्यान मौन बाळगून नरेंद्र मोदी 'उच्छाद मांडणाऱ्या जमावाचे मित्र' सिद्ध झाले," असं लेखात म्हटलं आहे.
आतिश तासीरने यांनी लिहिलं आहे की, "2014 मध्ये लोकांमध्ये दडलेल्या रागाला नरेंद्र मोदींनी आर्थिक आश्वासनांमध्ये बदललं. त्यांनी नोकरी आणि विकासाची आश्वासनं दिली. पण आर्थिक चमत्काराचं मोदींचं आश्वासन फोल ठरलं आहे. एवढंच नाही त्यांनी देशात विषारी धार्मिक राष्ट्रवादाचं वातावरण निर्माण करण्यात नक्कीच हातभार लावला आहे."
दुसऱ्या लेखात मोदींचं कौतुक
'टाइम' मासिकाच्या याच अंकातील दुसऱ्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांचं जोरदार कौतुकही केलं आहे. इयान ब्रेमर नामाच्या पत्रकाराने Modi Is India's Best Hope for Economic Reform अशा मथळ्याचा लेख लिहिला आहे. यात लिहिलं आहे की, भारताने मोदींच्या नेतृत्त्वात चीन, अमेरिका आणि जपानसोबतचे संबंध सुधारले आहेतच, पण त्यांच्या कौटुंबीक धोरणांमुळे कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल झाला आहे.
मोदींबद्दलची 'टाइम'ची भूमिका बदलली?
पंतप्रधान मोदी याआधीही 'टाइम' मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते. मे 2015 च्या अंकात 'व्हाय मोदी मॅटर्स' (Why Modi Matters) या मथळ्याखाली त्यांची विशेष मुलाखत प्रकाशित झाली होती. 'टाइम पर्सन ऑफ द इअर'साठी वाचकांची पसंती त्यांनी मिळाली होती.
'टाइम' मासिकाने 2014, 2015 आणि 2017 मध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत केला होता. 'टाइम' मासिकाचा मे 2015 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर मात्र 2019 मध्ये या यादीत मोदींचा समावेश नाही. तसंच मागील काही वर्षांमध्ये 'टाइम' मासिकाची पंतप्रधान मोदींबद्दलची भूमिका बदलल्याचं पाहायला मिळतं.
इंडियाज डिव्हायडर इन चीफ : 'टाइम'च्या कव्हर स्टोरीवरुन वादंग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 May 2019 01:05 PM (IST)
'टाइम' मासिकाने 2014, 2015 आणि 2017 मध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत केला होता. 'टाइम' मासिकाचा मे 2015 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर मात्र 2019 मध्ये या यादीत मोदींचा समावेश नाही. तसंच मागील काही वर्षांमध्ये 'टाइम' मासिकाची पंतप्रधान मोदींबद्दलची भूमिका बदलल्याचं पाहायला मिळतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -