मुंबई : शनिवार 20 जानेवारी रोजी मालदीवमधील (Maldives) एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. तसेच याचदरम्यान या मुलाच्या उपचारासाठी भारताकडून (India) देण्यात आलेल्या डोर्नियर विमानाचा उपयोग करण्यास राष्ट्राध्यक्षांनी परवानगी दिली नसल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 


मालदीवमध्ये मागील अनेक वर्षांपासून भारतीय सैन्याची एक छोटी तुकडी तैनात आहे. मालदीवमधील मागील सरकारने आपल्या सागरी संरक्षणासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी भारताचे सैनिक तैनात केलेत. पण सध्या मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांनी भारतीय सैन्याच्या या तुकडीला मालदीव सोडण्यास सांगितलं आहे. पण या दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 


एअर अॅम्बुलन्सची कुटुंबाने केली मागणी


माहितीनुसार, या मुलाला ब्रेन ट्युमर होता आणि स्ट्रोक झाल्यामुळे त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती. त्यावेळी त्या मुलाच्या कुटुंबाने गैफ अलिफ विलिंगिली इथे असलेल्या त्यांच्या घरापासून मालदीवची राजधानी माले इथे घेऊन जाण्यासाठी एअर अॅम्बुलन्सची मागणी केली. मालदीवच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकारी तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात अयशस्वी झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. 


16 तासांनंतर झाली उपचाराची व्यवस्था


या मुलाच्या वडिलांनी म्हटलं की, जेव्हा त्याला स्ट्रोकचा त्रास झाला तेव्हा आम्ही आयलँड अॅविएशनला फोन केला. पण त्यावेळी त्यांनी आमच्या फोनला उत्तर दिलं नाही. त्यांनी गुरुवार सकाळी 8.30 वाजता आम्हाला उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये केवळ एकाच एअऱ अॅम्बुलन्सचा उपयोग होऊ शकतो. या सगळ्या परिस्थितीमुळे या मुलाला तब्बल 16 तासांनी उपचार देण्यात आले.  


भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये कटुता 


पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर त्यांच्या या फोटोंवर मालदीवच्या मंत्र्यांनी टीका केली. या सगळ्यानंतर मालदीव आणि भारतामध्ये बराच तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी त्यांची मालदीवची ट्रीप देखील रद्द केली. त्यामुळे मालदीवला आर्थिकदृष्ट्या बराच फटका बसला. दरम्यान या सगळ्यामध्ये मालदीव आणि चीनचे देखील संबंध वाढत गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि मालदीवच्या संबंधावर चर्चा सुरु झाली. या घटनेमुळे पुन्हा एकदा मालदीव आणि भारतातील संबंधांमध्ये अद्यापही तणाव निर्माण झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. 


हेही वाचा : 


Maldives vs Lakshadweep : मालदीव की लक्षद्वीप कोणतं डेस्टिनेशन आहे बेस्ट? दोघांमधील फरक सविस्तर जाणून घ्या